पोलिसांच्या मदतीने 23 हजारांवर परप्रांतीय परतले मूळगावी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  लॉकडाऊनमुळे अडकून पडलेले शहरातील 23 हजार नागरिक मायदेशी पाठविले आहे. पोलीस, जिल्हा प्रशासन व पालिकेच्या मदतीने हे नागरिक आपल्या घरी पोहचले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन केल्यानंतर अनेकजण अडकून पडले होते. त्यानुसार शासनाच्या आदेशानुसार परप्रांतीय श्रमिक, विद्यार्थी आणि नागरिकांना मूळगावी पाठविण्याची प्रक्रीया ९ मे पासून सुरू करण्यात आली आहे. रेल्वे व खासगी बसद्वारे गावी पाठविण्यात येत आहे. काही दिवसांपुर्वी पुणे ते प्रयागराज-उत्तरप्रदेश रेल्वेमधून १ हजार ५२० जणांना रवाना करण्यात आले. त्यामध्ये परिमंडळ तीन मधील पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या परप्रांतीय नागरिकांचा समावेश आहे. तसेच पुणे रेल्वे स्टेशन ते बोतिया बिहार मार्गावर धावणाऱ्या रेल्वेतून १ हजार ४५२ नागरिकांना मूळगावी रवाना करण्यात आले. पुणे स्टेशन ते मारवाड-पाली-जयपूरमध्ये रेल्वेने १ हजार ९३ नागरिकांना पाठविण्यात आले. आतापर्यंत शहराच्या विविध भागात काम करणाऱ्या २३ हजार ३३० नागरिकांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात आले आहे.

पोलीस ठाणे स्थरावर या नागरिकांची नोंद करण्यात येत आहे. तर राज्यातच इतर जिल्ह्यात जाण्यासाठी पोलिसांचा पास घ्यावा लागत आहे. त्यानुसार हे आपल्या घरी परतत आहेत.

परराज्यात जाणाऱ्या मजूर तसेच इतरांसाठी पोलीस त्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी मेहनत घेत आहेत. दरम्यान या नागरिकांना बसने पुणे स्टेशन येथे नेले जाते. त्याठिकाणी सोशल पोलिसिंग सेलच्यावतीने सॅनिटायझर, मास्क, साबण वितरित करण्यात येत आहे. तर नागरिकांना खाद्यपदार्थ व पाण्याच्या बॉटल दिल्या जात आहेत. यावेळी आयपीएस ऑफीसर्स वाईफ ऑर्गनायझेशन यांच्या वतीने लहान मुले, वयोवृध्दासाठी दुध पॅकेट, गुळ वाटप केले जात आहे.

पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलिस उपायुक्त तथा नोडल अधिकारी सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त बच्चन सिंह तसेच स्थानिक पोलीस आणि त्या-त्या परिमंडळचे उपायुक्त यासाठी प्रयत्न करत आहेत. स्थानिक पोलीस या नागरिकांच्या अडचणी दूर करून त्यांना पाठवत आहेत. जातेवेळी या नागरिकांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा असतो. पोलिसांचे तोंडभरून कौतूक करत हे नागरीक निरोप घेतात. पुणे पोलिसांच्या या कामगिरीमुळे या नागरिकांच्या मनात पोलिसाबद्दल एक आत्मीयता दिसून येते.