Pune : एकतर्फी प्रेमातून 24 वर्षीय तरूणीला व तिच्या मित्राला बेदम मारहाण, कोथरूड परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोथरुड भागात प्रेमाला नकार देणाऱ्या तरुणीच्या मित्राला आणि तिला बेदम मारहाण करत मोबाईल अन रोकड चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. मयूर कॉलनीतील जोग शाळेसमोर हा प्रकार भरदिवसा घडला आहे.

याप्रकरणी कृष्णा डोंगरे व त्याच्या दोन साथीदारांवर कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 24 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा डोंगरे याचे फिर्यादी तरुणावर एकतर्फी प्रेम आहे. त्याने तरुणीला प्रेमाबाबत विचारना केली होती. पण, तिने नकार दिला होता. त्यानंतरही कृष्णा हा तिला प्रेमासाठी बोलत होता. तरुणी त्याला वारंवार नकार देत होती. तसेच “तू मला आवडत नसल्याचेही” तिने सांगितले होते. तरीदेखील तो पाठलाग करत असे. रविवारी फिर्यादी तरुणी व तिचा मित्र जात असताना मयूर कॉलनीतील जोग शाळेजवळ कृष्णा व त्याच्या दोन साथीदारांनी त्यांना अडवले. तसेच तरुणीला शिवीगाळ करत तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी तिचा मित्रमध्ये आला असता त्यालाही मारहाण केली. तरुणीच्या डोक्यात हातातील कडे मारून तिला गंभीर जखमी केल्यानंतर आरोपींनी त्यांच्याकडील रोख 7 हजार रुपये व फिर्यादीचा मोबाईल घेत पळ काढला. अधिक तपास कोथरुड पोलीस करत आहेत.