Pune : पांढरा हत्ती ठरलेले महापालिकेचे कचर्‍यापासून ‘बायोगॅस’ निर्मितीचे 25 प्रकल्प बंद होणार ! अन्य प्रकल्पात ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया करण्याचे नियोजन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ओल्या कचर्‍यापासून बायोगॅस निर्मिती करण्याचे प्रकल्प पांढरा हत्ती ठरल्याने येत्या काळात बायोगॅसचे सर्व प्रकल्प बंद करण्यात येतील. सध्या अस्तित्वात असलेल्या मोठ्या प्रक्रिया प्रकल्पांमध्ये ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया करून निर्माण होणारी स्लरी ‘सीएनजी’ निर्मितीच्या प्रकल्पाला देण्याचे नियोजन असल्याचे माहिती घनकचरा विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिली.
शहरातील कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने आतापर्यंत अस्तित्वात असलेेले विविध प्रकारचे प्रकल्प राबविले आहेत.

यामध्ये अगदी कचर्‍यापासून वीजनिर्मिती, खतनिर्मिती, सीएनजी गॅस निर्मिती तसेच जळाउ इंधन निर्मिती अशा विविध प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे. परंतू यापैकी काहीच प्रकल्प आर्थिक आणि व्यवहारीकदृष्टया सफल होउ शकले आहेत. २००८ -०९ या आर्थिक वर्षात ओल्या कचर्‍यापासून गॅस व त्यापासून वीज निर्मितीच्या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली. पुढील पाच ते सहा वर्षात विविध ठिकाणी आणखी २४ प्रकल्प उभारले गेले. पाच टन क्षमतेपर्यंतच्या या प्रकल्पांमध्ये दररोजन सरासरी १०० टन ओला कचरा, त्यातही हॉटेल वेस्टची विल्हेवाट लावण्यात येते. मात्र, मागील काही काळात यापैकी ५ प्रकल्प बंद अवस्थेत आहेत. तर मेन्टेंनन्स व अन्य कारणास्तवर अन्य प्रकल्पही पुर्ण क्षमतेने चालत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.

शहराच्या वाढीसोबत कचर्‍याचे प्रमाण वाढत आहे. आजही शहरात दररोज १हजार ८०० टन कचरा गोळा होतो. त्यामध्ये ८०० टन ओला कचरा आहे. यापैकी जेमतेम १०० टन कचर्‍यावर बायोगॅस प्रकल्पामध्ये प्रक्रिया केली जाते. परंतू या बायोगॅसपासून वीजनिर्मिती करण्याची यंत्रणा महागडी असल्याने हा गॅस हवेतच सोडला जातो. विशेष असे की शहरातील हॉटेलमधून गोळा केल्या जाणार्‍या ओल्या कचराच बायोगॅस प्रकल्पांना दिला जातो. बायोगॅस प्रकल्पाचे आयुष्यमान ५ वर्षांचे असून जवळपास सर्वच प्रकल्प ७ ते १० वर्षांपासून सुरू आहेत. अलिकडे मात्र, सातत्याने बिघाड, वाढलेली मेन्टेनन्स कॉस्ट यामुळे हे प्रकल्प पांढरा हत्ती ठरत आहेत. विशेष असे की कोरोना साथीच्या काळात हॉटेल व्यवसाय जवळपास सहा महिने बंदच राहील्याने अनेक प्रकल्प घरातून गोळा होणार्‍या ओल्या कचर्‍यावर मात्र कमी क्षमतेने सुरू राहीले.

यासंदर्भात घन कचरा विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, बायोगॅस प्रकल्प हे खर्चिक ठरू लागले आहेत. तंत्रज्ञानात फारशा सुधारणा करण्यास वाव नसल्याने मागील सहा ते सात वर्षांत नवीन प्रकल्प सुरू केलेला नाही. हे सर्व प्रकल्प त्यापुर्वीचेच आहेत. बाणेर येथील नोबेल कंपनी मार्फत चालविल्या जाणारा ओल्या कचर्‍यावरील प्रकल्प २५० टन क्षमतेचा आहे. तसेच हडपसर येथील अजिंक्य कंपनीच्या मार्फत चालविल्या जाणार्‍या प्रक्रिया प्रकल्पाची क्षमताही ३०० टनाची आहे.

नोबेल कंपनी मार्फत चालविल्या जाणारा प्रकल्प पुर्ण क्षमतेने सुरू केला जाणार आहे. येथे निर्माण होणार्‍या स्लरीपासून सीएनजी गॅस निर्मितीचा प्रकल्प यापुर्वीच तळेगाव येथे खाजगी कंपनीच्या सहकार्याने उभारण्यात आला आहे. ही स्लरी त्या कंपनीला देण्यात येणार आहे. तसेच अजिंक्य कंपनीकडून चालविल्या जाणारा प्रकल्पही पुर्ण क्षमतेने सुरू करण्यात येणार आहे. उर्वरीत ओला कचरा शेतीसाठी पाठविण्यात येईल. याबाबत लवकरच अंतिम निर्णय घेउन कार्यवाही करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.