सराईताच्या खूनप्रकरणी तिघांना सातारा जिल्ह्यातून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील हडपसर भागात पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगाराचा दगडाने ठेचून खून केल्याप्रकरणी तिघा जणांना गुन्हे शाखेने सातारा जिल्ह्यातून अटक केली. सराईत गुन्हेगारांमधील वादातून हा प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे.

जीवन गंगाराम कांबळे (वय ३१, रा. हडपसर), अनिकेत बालाजी सोनवणे (वय २२, रा. फरसुंगी) आणि विलास रघुनाथ पाटोळे (वय २८, रा. वडकी, हवेली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शोएब शेख असे खून झालेल्याचे नाव आहे.

जीवन कांबळे आणि शोएब शेख सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत. दीड वर्षांपुर्वी बसवराजने जीवनला मारहाण केली होती. त्याचा राग असल्यामुळे काल सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास शोएब दुचाकीवरुन आईला कामावर सोडून घराकडे परत येत तिघांनी त्याला अडवले. त्याच्या डोक्यात दगड मारून खून केला. त्यानंतर तिघेही सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोरेगावमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत जीवनने खुनाची कबुली दिली आहे.