Pune : कोंढव्यातील टोळीप्रमुखासह 3 गुंड 2 वर्षांसाठी तडीपार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   कोंढवा पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील एका टोळीतील टोळीप्रमुखासह तिघा गुंडांना २ वर्षांसाठी परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी तडीपार केले आहे.

परिमंडळ ५ चा कार्यभार स्वीकारल्यानंतर पाटील यांनी केलेली ही पहिलीच कारवाई आहे.
टोळीप्रमुख मुकुल सुनिल भंडारी (वय २६, रा. कृष्णानगर, महमंदवाडी), क्रिप्सन लॉरेन्स परदेशी (वय २४, रा. वानवडी गाव), रियाज सिराज शेख (वय २७, रा. हडपसर सध्या कृष्णानगर) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत.

या टोळीवर कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये शरीराविरुद्ध ७ गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई केल्यानंतरही त्यांनी पुन्हा गुन्हे केले असून कोंढवा परिसरात त्यांची दहशत आहे. लोकांना दमदाटी करुन लुटमार करण्याचे प्रकार ते करतात.

police

दरम्यान कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक महादेव कुंभार गुन्हे , सहायक निरीक्षक चेतन मोरे, उपनिरीक्षक संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या आरोपींविरुद्ध तपास पथकातील हवालदार माने, तानवडे व पाटील यांनी तडीपाराची प्रस्ताव उपायुक्त नम्रता पाटील यांना सादर केला होता. त्यानुसार पाटील यांनी तिघांना पुणे शहर व जिल्ह्यातून २ वर्षांसाठी तडीपार केले आहे. तिघांना सोमवारी कोल्हापूर, सातारा व सोलापूर येथे सोडण्यात आले आहे.