वाहतूक, दामिनी पथक अन् पेट्रोलिंग करणार्‍या पोलिसांच्या हजेरीसाठी शहरात 4000 QR कोड

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरातील 30 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत “क्यूआर कोड” बसविण्यात आले आहेत. त्यामुळे आता वाहतूक कर्मचारी, दामिनी पथक, पेट्रोलिंग कर्मचारी यांची त्या ठिकाणची उपस्थितीची नोंद होणार आहे. 4 हजार क्यूआर कोड बसविले गेले आहेत.

वाढत्या गुन्ह्यासाठी, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अन महिलांच्या सुरक्षिततेसाठी स्थानिक पोलीस, वाहतूक विभाग तसेच दामिनी पथक आणि गुन्हे शाखेच्या पथकाकडून गस्त घातली जाते. पण अनेक वेळा हे अधिकारी कर्मचारी धावती पेट्रोलिंग करतात आणि कागदोपत्री काम केल्याचे दाखवितात. दरम्यान यानंतर गेल्या काही महिन्यात पेट्रोलिंगसाठी असणाऱ्या रजिस्टरवर स्वाक्षरी करुन उपस्थिती नोंदविण्यात येत होती.

पुणे पोलिसांनी उभा पुढचे पाऊल टाकत थर्ड आय कार्यप्रणालीच्या माध्यमातून पोलिस प्रशासनाकडून क्यूआर पेट्रोलिंग अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे. त्यानुसार क्यू आर कोड बसविण्यात आले. त्यामुळे पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यासह दामिनी पथक, वाहतूक कर्मचाऱ्याना क्यूआर कोड स्कॅन करुन उपस्थिती लावावी लागत आहे.

क्यूआर कोडचे नियत्रंण गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. तर वाहतूक नियमनासाठी महत्वाच्या आणि गर्दीच्या ठिकाणी बसविण्यात आलेल्या क्यूआर कोडचे स्कॅनिंग करुन उपस्थिती लावावी लागत आहे. तसेच पेट्रोलिंगसाठी नेमण्यात आलेल्या बीट मार्शल, सीआर मोबाईल, पोलीस निरीक्षक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या क्यूआर कोड स्कॅनिंगचे नियंत्रण संबंधित पोलिस ठाण्यांकडून करण्यात येत आहे. यामुळे कामचुकार पणा करता येणार नाहीच पण गुन्हे नियंत्रण ठेवण्यासाठी मदत होणार आहे.

You might also like