Pune : पिस्तुलच्या धाकाने व्यापार्‍याकडील 44 हजारांची रोकड लुटली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात लूटमारीच्या घटना वाढतच चालल्या असून, चक्क भरदिवसा दुकानात घुसून पिस्तुलाचा धाक दाखवत लाकूड व्यापाऱ्याजवळील ४४ हजारांची रोकड लुटल्याची घटना घडली आहे. मुंढवा परिसरात हा प्रकार घडला आहे.

जालाराम प्रजापती (वय ४५,रा. मांजरी बुद्रुक) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रजापती यांचे मुंढव्यातील केशवनगर भागात गणेश टिंबर मार्केट दुकान आहे. शुक्रवारी (३० ऑक्टोबर) प्रजापती दुकानात होते. दुपारी सव्वातीनच्या सुमारास दोन चोरटे दुकानात शिरले. एकाने कंबरेचे पिस्तुल बाहेर काढले व प्रजापती यांच्यावर रोखले. तर त्यांचा यांचा गळा दाबला. ओरडल्यास जीवे मारू, अशी धमकी दिली. तर आम्हाला दुकानात २० लाखांची रोकड असल्याची माहिती मिळाली आहे, असे म्हणत विचारपूस केली.

प्रजापती यांना धमकावून चोरट्यांनी गल्ल्याची पाहणी केली. पण त्यात पैसे नव्हते. मग चोरट्यांनी तुमच्या मुलाला पाच लाख रुपयांची रोकड घेऊन यायला सांगा, असे सांगितले. चोरट्यांनी पुन्हा गल्ल्याची पाहणी केली. गल्ल्यातील ४४ हजार ५०० रुपयांची रोकड घेऊन चोरटे दुचाकीवरुन पसार झाले. त्यानंतर घाबरलेल्या प्रजापती यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करण्यात येत असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक विजय चंदन करत आहेत.