Pune : महापालिकेच्या शहरी गरिब योजनेअंतर्गत उपचारासाठी आणखी 48 खाजगी रुग्णालये उपलब्ध होणार : रुबल अग्रवाल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महापालिकेच्या हद्दीमध्ये राहाणार्‍या महापालिकेच्या शहरी गरीब योजनेतील नागरिक आणि अंशदायी योजनेतील महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचार्‍यांवरील उपचारांसाठी पुणे महापालिकेने आणखी ४८ रुग्णालयांचा समावेश केला आहे. पुर्वीची ७६ आणि नव्याने ४८ रुग्णालये समाविष्ट केल्यानेे जवळपास सर्वच भागातील नागरिकांना उपचाराची सुविधा उपलब्ध होणार आहे.

पुणे महापालिकेने एक लाख रुपयांच्या आतमध्ये वार्षिक उत्पन्न असलेल्या नागरिकांसाठी साधारण दहा वर्षांपुर्वी शहरी गरीब योजना सुरू केली आहे. या योजनेतून सीएचएस दराने नागरिकांना उपचारासाठी एक लाख रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य देण्यात येते. कॅन्सर, ह्दयरोगावरील उपचारांसाठी दोन लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य करण्यात येते. या योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे पाच लाखांहून अधिक नागरिकांना उपचार मिळाले आहेत. एवढेच नव्हे तर सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या साथीतही सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांना या योजनेचा चांगलाच लाभ झाला आहे.

या योजनेअंतर्गत महापालिकेने यापुर्वी शहरातील ७६ रुग्णालयांशी करार केलेले आहेत. २० पेक्षा अधिक बेडस्ची क्षमता तसेच आपरेशन थिएटर आदी सुविधा असलेल्या नामांकित रुग्णालयांचा यामध्ये समावेश आहे. मात्र, शहराची व्याप्ती आणि लोकसंख्या पाहाता, अन्य रुग्णालयांनीही महापालिकेकडे सीएचएस दराने उपचार करण्याची तयारी दर्शविली होती. तसे अर्जही केले होते.

मागील दीड ते दोन वर्षांपासून खाजगी रुग्णालयांकडून आलेल्या अर्जांनुसार रुग्णालयांतील सुविधांची पाहाणी व आवश्यक मनुष्यबळाची पाहाणी केल्यानंतर आज त्यापैकी आणखी ४८ रुग्णालयांचा या योजनेसाठी समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली. विशेष असे की यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील दोन रुग्णालयांचाही समावेश करण्यात आला आहे. महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी या भागातही राहायला असल्याने त्यांना अथवा त्यांच्या कुटुंबियांना या रुग्णालयांमध्ये उपचार घेणे शक्य होणार असल्याचे अग्रवाल यांनी नमूद केले.