Pune : आंबिल ओढाच्या परिसरात झाडाची फांदी कोसळून 5 महिला जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आंबिल ओढाच्या परिसरात झाडाची फांदी कोसळून पाच महिला जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी सायंकाळी हा प्रकार घडला आहे. यात तीन महिलांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शारदा थोरात, सुरेखा आरडे, लक्ष्मी कसबे, सारिका शिंदे, पार्वती सोनवणे (रा. आंबिल ओढा वसाहत, सदाशिव पेठ) अशी जखमी झालेल्या महिलांची नावे आहेत.

गुरुवारी सायंकाळी थोरात, आरडे, कसबे, शिंदे, सोनवणे एसपीएम शाळेजवळील चौकात पदपथावर बसल्या होत्या. त्यावेळी अचानक मोठ्या झाडाची फांदी त्यांच्या अंगावर कोसळली. या भागातील रहिवाशांनी तातडीने चार महिलांना खासगी रूग्णालयात दाखल केले. एक महिला झाडाच्या फांदीखाली अडकली होती. रहिवाशांनी या घटनेची माहिती जनता वसाहतीतील अग्निशमन दलाच्या केंद्राला दिली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवानांनी धाव घेऊन महिलेस बाहेर काढले.

दोन महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत. तर तीन महिलांना गंभीर दुखापत झाली असल्याचे अग्निशमन दलाने सांगितले. उद्यान विभागाच्या दुर्लक्षामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. दरम्यान शहरात गेल्या वर्षी झाडांच्या फांद्या अंगावर पडून दोघांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतरही उद्यान विभाग या धोकादायक फांद्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.