Pune : जम्बो रुग्णालयात 500 हून अधिक रुग्ण झाले ‘कोरोना’मुक्त !, 31 दिवसांच्या लढाईनंतर ‘तिनं’ लढाई जिंकली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एक गंभीर अवस्थेतील करोनाबाधित महिला पेशंटने तब्बल एकतीस दिवस करोनाविरुद्ध लढा देत अखेर करोनावर विजय मिळवला आहे. ही करोनाबाधित महिला COEP मैदानावरील जम्बो रुग्णालयात दाखल झाली होती. येथे आठ दिवस व्हेंटिलेटरवर असूनही इच्छाशक्ती व येथील सर्व करोना योद्धे यांच्या प्रयत्नांच्या जोरावर तिने करोनावर मात केली आहे. आज तिला डिस्चार्ज देण्यात आला तेव्हा त्यांची सुरवातीची अवस्था पाहणाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातल्या यवतच्या संगीता पांढरे या महिलेनी ही लढाई जिंकली आहे!

श्रीमती पांढरे या सीओईपी जम्बो रुग्णालयात ३१ ऑगस्ट रोजी दाखल झाल्या होत्या. श्वसनाचा त्रास होत असल्याने सुरवातीला त्यांना दहा दिवस थेट ऑक्सिजन बेडवर दाखल करण्यात आले. नंतर अत्यवस्थ झाल्याने त्यांना दहा दिवस आयसीयू बेडवर हलविण्यात आले. त्यापैकी आठ दिवस त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. मात्र श्रीमती पांढरे यांनी जिद्ध सोडली नाही. वीस दिवसांनी त्यांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा दिसू लागली. तेव्हा पुन्हा ऑक्सिजनचा आधार देत दहा दिवस जनरल वॉर्डमध्ये उपचार केल्यावर त्यांची प्रकृती स्थिर करण्यात आली. आणि अखेर तीस दिवसांच्या निकराच्या लढाईनंतर गुरुवारी, १ ऑक्टोबर रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला… तेव्हा त्यांचे सर्व कुटुंबीय भावुक झाले होते…!
सर्वांनी त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले. तसेच कुटुंबीयांनी जम्बो कोविड सेंटरमधील सर्व करोना योद्धे आणि प्रशासनाला मनोमन धन्यवाद दिले. तसेच, एक करोनाबाधित दाम्पत्यही आज एकाच वेळी बरे होऊन जम्बोमधून घरी गेले. हे दिलासादायक चित्र आहे.

सातत्यपूर्ण देखभालीमुळे जम्बो रुग्णालयात बरे होऊन घरी सोडण्यात आलेल्या करोनामुक्तांच्या संख्येने आता पाचशेचा टप्पा ओलांडला आहे. आज (गुरुवारी) दहा रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले. यामुळे आतापर्यंत जम्बोमध्ये उपचार घेऊन करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ५०० झाली आहे, असे अतिरिक्त मनपा आयुक्त व जम्बो कोविड रुग्णालयाच्या कार्यकारी अध्यक्षा रुबल अग्रवाल यांनी सांगितले.

इतर व्याधी असणाऱ्या (कोमॉर्बिड) करोना रुग्णांना सर्व उपचार मिळावेत यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. जम्बो कोविड सेंटरमध्ये सहव्याधी रुग्णांवर आवश्यक उपचारांसाठी सर्वतोपरी प्रयत्न, तसेच मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी तज्ञ डॉक्टर सातत्याने उपलब्ध ठेवण्यात येत आहेत. रक्तशुद्धीकरणाची सुविधेकरिता दहा डायलिसिस मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like