Coronavirus : दिलासादायक ! पुणे शहरातील 50 हजार जण आतापर्यंत झाले ‘कोरोना’मुक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   शहरात टेस्टिंग वाढल्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये नवीन कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. सोमवारीही शहरात नवीन ७६१ रुग्ण आढळले असून तब्बल १ हजार ४९९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या १५ हजार ४३ पर्यंत आली आहे. यापैकी जवळपास निम्मे रुग्ण होम क्वारंटाईनमध्ये असल्याने रुग्णालये आणि कोव्हीड सेंटरवरील ताणही जुलैच्या तुलनेत कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. दुर्देवाने उपचार घेणार्‍या महापालिका हद्दीबाहेरील ११ रुग्णांसह ४२ जणांचा मृत्यू झाला आहे. परंतू एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत मृत्यूदरही घटला असून १. टक्क्यापर्यंत खाली आला आहे.

मार्चमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर मागील पाच महिन्यांत रुग्णसंख्या ६६ हजार ७२७ वर पोहोचली आहे. महापालिका प्रशासनाने कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांच्या चाचण्यांवर अधिक भर दिल्याने रुग्णसंख्या वेगाने वाढली आहे. आजपर्यंत ३ लाख २४ हजार ७२१ टेस्ट घेण्यात आल्या आहेत. पुणे शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत टेस्टचे प्रमाणही जवळपास ८ टक्क्यांवर पोहोचले आहे. शहरात आज ५ हजार १३३ संशयितांचे स्वाब व अँटीजेन किटद्वारे टेस्ट करण्यात आल्या आहेत. आतापयर्र्त ५० हजार ११३ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून उपचार घेणार्‍या रुग्णांची संख्या १५ हजार ४३ पर्यंत खाली आली आहे. यापैकी ७३८ रुग्णांना ऑक्सीजनवर ठेवण्यात आले असून ४४४ रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत.तर शहरातील मृतांची संख्या १ हजार ५७१ वर पोहोचली आहे.