Pune : पुणे शहरात गेल्या 48 तासांमध्ये झाडपडीच्या 55 घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कडक उन्हाळ्यात आलेल्या चक्री वादळांने शहरात गेल्या दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू असून, त्याचा पुण्याला देखील फटका बसला असून, 55 झाडे पडली आहेत. सुदैवाने यात कोणी जखमी झालेले नसले तरी वाहनांचे नुकसान झोले आहे.

शहर परिसरात शनिवारी रात्रीपासून चक्रीवादळामुळे जोरदार वारे वाहत आहेत. तर अधून मधून पाऊस देखील पडत आहे. सुसाट वारा वाहत असल्याने या काळात दोन दिवसांत शहरातील विविध भागात 55 ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये कोणी जखमी नसल्याचे सांगण्यात आले आहे.

अग्निशमन दलाकडे या नोंदी करण्यात आल्या आहेत. नियंत्रण कक्षात माहिती आल्यानंतर या परिस्थितीतही जवानांनी घटनास्थळी धाव घेत ही झाडे बाजूला करत रस्ता मोकळा केला आहे. निर्बंधामुळे शहरातील रस्त्यावर फारशी वाहने नसल्याने वाहतूक विस्कळीत झाली नाही. शनिवारी रात्री ते रविवारी दिवसभर 17 तसेच रविवारी रात्री व सोमवारी दिवसभर 38 ठिकाणी झाडे कोसळली.

शहरात कात्रज येथील तिरंगा हॉटेल, लक्ष्मी रस्त्यावरील सोन्या मारुती चौक, धनकवडीतील राजमुद्रा सोसायटी, सोमवार पेठेतील पवार वाडा, कोंढव्यातील एनआयबीएम रस्ता परिसरातील सनश्री सोसायटी, कोरेगाव पार्क गल्ली क्रमांक 7, हडपसर, काळेपडळ, दत्तवाडी, हडपसर औद्याोगिक वसाहत, विधी महाविद्याालय रस्ता परिसरातील दामले पथ, सेनापती बापट रस्त्यावरील जे. डब्ल्यू. मेरीयट हॉटेलजवळ, बी. टी. कवडे रस्ता, गणेशखिंड रस्ता, नेहरू रस्त्यावरील कल्याण भेळ परिसरात झाडे कोसळली आहेत.