ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याच्या प्रयत्नातील 7 जणांची टोळी अटकेत

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – नर्हे परिसरातील ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सातजणांच्या टोळीला सिंहगड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून तीन कोयते, मीरचीपूड, कटावणी अशी घातक हत्यारे जप्त करण्यात आले.

सागर बसवराज नडगिरे (वय १९, रा. वडगाव बुद्रूक), राहूल गंगाराम मरगळे (वय १९, रा. शिरकुले, हवेली), शुभम सचिन उफाळे (वय २०, रा. वडगाव), समीर मोहन चांदेकर (वय २०, रा. धायरी), सागर शरनम रणसौरे (वय २०, रा. धायरी), हर्षद गणेश जातेगावकर (वय २१, रा. धायरी), शुभम सुनिल चव्हाणे (वय २१, रा. आंबेगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई दयानंद तेलंगे पाटील यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड पोलिस काल मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास नर्हे परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी ग्रॅडीयर सोसायटीसमोरील रस्त्यावर सात जणांचे टोळके संशयास्पद फिरत असल्याचे पोलिसांना दिसले. त्यानुसार पोलिसांनी सागर, राहूल, शुभम, समीर, रणसौरे, हर्षद, चव्हाणेला ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे तीन कोयते, मिरचीपूड, कटावणी, दोर, बॅटरी, स्क्रू ड्रायव्हर साहित्य मिळून आले. चौकशीत त्यांनी नर्हे परिसरातील ज्वेलर्सवर दरोडा घालणार असल्याची कबुली दिली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले अधिक तपास करीत आहेत.

You might also like