Pune : 7 जणांची 32 कोटींची फसवणूक ! वेल्थ प्लॅनेट लि. (यु.के.) कंपनीचा CEO अभिजीत कुलकर्णी, टिम लिडर प्रज्ञा कुलकर्णी, CFO अनिकेत कुलकर्णी, COO श्वेता नातु आणि नितीन पाष्टे विरूध्द डेक्कन पोलिस ठाण्यात FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  लॉ कॉलेज रस्त्यावर एका उच्चभ्रू इमारतीत सुरू केलेल्या ‘वेल्थ प्लॅनेट लि. (यु के)’ या कंपनीने पुण्यातील बड्या व्यवसायिकासह 7 जणांची तबल 32 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या कंपनीत गुंतवणूक केल्यास 270 टक्के परतावा मिळवून देण्याच्या आमिष दाखवून पैसे गुंतवण्यास भाग पाडले आहे.

याप्रकरणी हेमंत बाळकृष्ण गुजराथी (वय 50) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार कंपनीचा सीईओ अभिजीत संजय कुलकर्णी, पत्नी प्रज्ञा अभिजीत कुलकर्णी, अनिकेत संजय कुलकर्णी, श्वेता श्रीधर नातू व नितीन पाष्टे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजीत कुलकर्णी हा वेल्थ प्लॅनेट लिमिटेड या कंपनीचा CEO आहे. तर त्याची पत्नी प्रज्ञा ही टीम लीडर असून, अनिकेत हा CFO आहे. श्वेता ही COO आणि नितीन पाष्टे हा ओव्हरसिज सपोर्ट हेड होता. दरम्यान, यातील फिर्यादी हे व्यवसायिक असून, त्यांची चाकण भागात कंपनी आहे. आरोपीने फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. त्यांना वेल्थ प्लॅनेट लि. (यु के) या कंपनीत गुंतवणूक केल्यास 270 टक्के परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते.

आरोपींच्या या आमिषाला फिर्यादी बळी पडले आणि त्यांनी 2 कोटी रुपये भरले. मात्र त्यांना मुद्दल ठेव तसेच त्याचा परतावा 5 कोटी 66 लाख आणि नुकसान भरपाई 4 कोटी 75 लाख 44 हजार रुपये असे एकूण 12 कोटी 41 लाख 44 हजार रुपये परत न करता त्यांची फसवणूक केली आहे. तर फिर्यादी यांच्यासोबत आणखी 6 जणांना देखील अश्याच प्रकारे पैसे भरण्यास भाग पाडून 19 कोटी 51 लाख रुपये न देता त्यांनाही फसवले आहे. अश्या प्रकारे या कंपनीने फिर्यादी व इतरांची एकूण 31 कोटी 92 लाख 44 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. हा सर्व प्रकार 2018 ते 2021 या कालावधीत घडला आहे. दोन वर्ष या आरोपींनी पैसे देतो म्हणून फक्त टाळाटाळ केली. तर फिर्यादी यांना 12 कोटी रुपयांचे चेक दिले. मात्र त्यातला एकही चेक बँकेत वटला गेला नाही. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची प्राथमिक चौकशी करून वरिष्ठांच्या मार्गदनाखाली गुन्हा दाखल केला असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक करपे यांनी सांगितले.