पुण्यात सायंकाळी 7 ते सकाळी 7 ‘कर्फ्यु’

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरात सायंकाळी 7 ते सकाळी 7 या वेळेत कर्फ्यु लागू करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी रात्री उशिरा काढले आहेत. तर यापूर्वीच पालिकेने शहरातील आस्थापना आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आदेश काढले आहेत. यानुसार ‘कंटेन्मेंट’ झोन क्षेत्र मात्र बंदच राहणार आहे. वाहतूक पोलिसांनी देखील या भागातील वाहतूक बंदच ठेवली आहे.

राज्यात 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढविला आहे. ‘कंटेन्मेंट’ झोन आणि नॉन ‘कंटेन्मेंट’ झोन असे दोनच भाग तयार केले आहेत. यानुसार ‘कंटेन्मेंट’ झोनमध्ये नियम पूर्वी सारखेच असणार आहेत. तर नॉन ‘कंटेन्मेंट’ झोनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणली आहे. मात्र राज्यात सायंकाळी 7 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 7 यावेळेत पूर्ण बंदी आहे. त्यानुसार पुण्यात देखील अत्यावश्यक सेवा वगळता या वेळेत कर्फ्यु लागू केला आहे. यानुसार कोणालाही विनाकारण बाहेर पडता येणार नाही. तसेच वाहने देखील रस्त्यावर आणता येणार नाहीत. 31 मे पर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत.