Pune : OLX वर बनावट प्रोफाईल उघडून केले भलतेच धंदे, तरूणाकडून 7.35 लाख रूपये किंमतीचे 8 कॅमेरे जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   ओएलएक्सवर बनावट प्रोफाईल उघडून त्याद्वारे नागरिकांचे महागडे कॅमेरे भाड्याने घेऊन त्यांची फसवणूक करणाऱ्या तरुणाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 7 लाख 35 हजार रुपये किंमतीचे 8 कॅमेरे जप्त करण्यात आले आहेत.

संग्राम गणेश मांढरे (वय १९, रा. नागोबा आळी, भोर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

कात्रज परिसरातील एका व्यक्तीने झुबेर अब्दुल मजीद गाझी व आनंद डिकोळे यांना त्यांच्याकडील कॅमेरे ओएलएक्सवर भाड्याने लावून देतो, असे आमिष दाखविले. त्यांना कात्रज चौक येथे बोलवून त्याचे साडेतीन लाख रुपये किंमतीचे कॅमेरे पाच सप्टेंबर रोजी घेऊन गेला होता. त्यानंतर त्यांना कॅमेरेही मिळाले नाही. त्या व्यक्तीशी संपर्क झाला नाही. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना भारती विद्यापीठ पोलिसांना माहिती मिळाली की, कॅमेरे घेऊन जाणारा हर्षल थोपटे नाव सांगणारा तरुण किनारा हॉटेलजवळ थांबला आहे. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक वसंत कुंवर, उपनिरीक्षक महेंद्र पाटील व श्रीधर पाटील, गणेश सुतार, राजू वेगरे, निलेश खोमणे, समीर बागसीराज, प्रणव संकपाळ, हर्षल शिंदे, शंकर कुंभार, शिवराज गायकवाड यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याचे नाव संग्राम मांढरे असल्याचे आढळून आले. त्याच्याजवळ शुटिंगचे महागडे आठ कॅमेरे आढळून आले. त्यामुळे त्याने आणखी काही व्यक्तींना फसविल्याची शक्यता आहे. ज्या नागरिकांची अशा पद्धतीने फसवणू झाली आहे. त्यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ओएलएक्सवर तो एक बनावट प्रोफाईल उघडायचा. त्या ठिकाणी नागरिकांना तुमचे कॅमेरे भाड्याने लावून दिले जातील. त्या बदल्यात महिन्याला पैसे मिळतील, असे सांगायचा. नागरिक देखील त्याच्या आमिषाला बळी प़डून त्याला कॅमेरे देत असत. कॅमेरे देतेवेळी थोडीशी रक्कम त्यांना देऊन बनावट आधारकार्ड त्यांना देत असे. कॅमेरा मिळाल्यानंतर ती प्रोफाईल बंद करत असे. त्यानंतर हे कॅमेरे विक्री करत असल्याचे समोर आले आहे.