Pune : 17 वर्षीय मुलीला नारायण पेठेतून फूस लावून पळवलं, वडिलांनी पोलिस स्टेशनच्या पायर्‍या झिजवल्या, अखेर पित्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  एका 17 वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेल्यानंतर त्याबाबत पोलिसांकडे तक्रार देऊनही पोलिसांनी दाद न दिल्याने मानसिक तणाव आल्याने वडिलांचा अचानक ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना मध्यवस्तीत घडली. मुलीचा शोध लागल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता.

नारायण पेठेत राहणार्‍या 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मुलीचे विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अपहरण झाले होते. त्याबाबत अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. मुलीच्या कुटूंबियांनी संशयीत आरोपीची माहिती पोलिसांनी दिली. संशयीत आरोपी घरी मिळून आला नाही. तो पोलिसांच्या रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. दरम्यान, 17 वर्षीय मुलीचे वडिल सातत्याने पोलिसांकडे याबाबत माहिती घेत होते. ते शनिवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेले होते. मात्र, कोविडमुळे त्यांची कोणासोबत भेट झाली नाही. यामुळे त्यांनी सोमवारी अतिरिक्त पोलीस आयुक्तांना भेटण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी एक अर्जही तयार ठेवला होता. मात्र सतत ताण-तणावाखाली राहिल्याने त्यांचा रविवारी रात्री ह्रदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर मात्र कुटुंबाने त्यांचा मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय घेतला. संशयीत आरोपीच्या घरच्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. यानंतर पोलीसानी दहा दिवसांत या गुन्ह्याचा तपास करू असे लेखी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. नारायण पेठेत राहणार्‍या 45 वर्षीय व्यक्तीच्या 17 वर्षीय मुलगीला एप्रिल महिन्यात पळवून नेण्यात आले आहे.

आरोपीचा शोध सुरु आहे. आमचे पथक सतत त्याच्या मागावर आहे. यामुळे आरोपी लवकरच ताब्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक विजय टीकोळे यांनी दिली आहे.