Pune : खडकी परिसरात 2 महिन्याच्या बाळाला पिशवीत घत्तलून रस्त्यावर सोडलं, भटक्या कुत्र्यांपासून लोकांनी वाचवलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   पुण्यातील खडकी भागात दोन महिन्याच्या बाळाला पिशवीत घालून रस्त्यावर सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पादचारी व पोलिसांच्या तत्परतेमुळे भटक्या कुत्र्यांपासून बाळाला वाचविण्यात यश आले आहे. त्या पालकांचा शोध घेतला जात आहे.

शहरातील खडकीतील मेथॅलिक चर्चजवळील मोकळ्या जागेत मंगळवारी एका पिशवीत बाळाला ठेवल्याचे पादचाऱ्याला दिसून आले होते. संबंधिताने तातडीने खडकी पोलिसांनी माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बाळाला घेतले व ससून रुग्णालयात दाखल केले. दोन महिन्याचे पुरुष जातीचे बाळ असून चेहरा गोल, नाक सरळ, अंगाने मध्यम, रंग गोरा असल्याचे पोलिसांनी सांगितले. बाळाच्या पालकत्वाची जबाबदारी न स्वीकारण्याच्या उद्देशाने त्याला रस्त्यावर ठेवण्यात आल्याचे दिसून आले आहे.

एका पिशवीत दोन महिन्यांचे बाळ मिळाले आहे. त्या बाळाला ससून रुग्णालयात दाखल केले. बाळाची प्रकृती उत्तम असून यासंदर्भात कोणाला माहिती असल्यास खडकी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन, महिला उपनिरीक्षक वैशाली सूळ यांनी केले आहे.