Pune : अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून सख्या बहिणीच्या 3 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडवून खून; मार्केटयार्ड परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून सख्या बहिणीच्या तीन वर्षीय मुलाला पाण्यात बुडवून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मार्केटयार्ड परिसरात एका बांधकाम साईडवर ही घटना घडली आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणत गुन्हा दाखल केला आहे.

चाकेन अवधेश वर्मा (वय 3) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी निर्मला कैलास वर्मा (वय 22) असे अटक केलेल्या महिकेचे नाव आहे. याबाबत अवधेश धनीराम वर्मा (वय 27, युनी वास्तु इंडिया कंपनी, लेबर कॅम्प) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 1 मे रोजी हा प्रकार घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्यादी हे नातेवाईक आहेत. फिर्यादीची पत्नी व निर्मला या सख्या बहिणी आहेत. हे सर्वजण मार्केटयार्ड परिसरातील एका बांधकाम साईटवर काम करतात. तिथेच लेबर कॅम्पमध्ये राहण्यासाठी आहेत. निर्मला हिला बहिणीचे आपल्या पतीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता.

याचा राग तिच्या मनात होता. या रागातून व संशयातून निर्मला हिने बहिणीचा मुलगा चाकेन हा बांधकाम साईट च्या मागच्या बाजूला खेळत होता. त्यावेळी निर्मला ही त्याला उचलून घेऊन गेली. बांधकाम साईटच्या ग्राउंड फ्लोरच्या लिफ्ट जवळ असणाऱ्या खड्ड्यातील पाण्यात त्या मुलाला फेकून दिले. यामध्ये बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला.

सुरुवातीला याप्रकरणी अकस्मात मृत्यूचा नोंद करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी चौकशी केली. सीसीटीव्ही पाहिले. त्यात निर्मला ही त्याला घेऊन जात असताना दिसली. तो तिच्या मागे जात होता. थोड्यावेळाने ती एकटीच परत आली. पण तो परत आला नाही. त्यावरून चौकशी केली असता तिने पाण्यात फेकल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली. अधिक तपास मार्केटयार्ड पोलीस करत आहेत.