Pune : सिंहगड रोड परिसरातील 75 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण, मुलगा अन् सुनेकडून धक्कादायक प्रकार

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – सिंहगड भागात एका 75 वर्षीय जेष्ठ महिलेला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्या महिलेला मुलाने आणि सुनेने घरात न घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पण, सिंहगड पोलिसांना हे प्रकरण समजल्यानंतर त्यांनी या मुलाला अन सुनेला जाब विचारत पुन्हा त्या जेष्ठ महिलेला घरात प्रवेश मिळवून दिला आहे.

झाले असे, नर्हे परिसरात जेष्ठ महिला मुलगा अन सुनेसोबत राहते. मुलगा रिक्षा चालवतो. मध्यमवर्गीय हे कुटुंब आहे. काल (मंगळवारी) जेष्ठ महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. यानंतर त्या क्वारंटाईन होण्यासाठी घरी आल्या. पण घराला कुलूप होते. मग त्यांनी मुलाला आणि सुनेला फोन केला ते काही फोन उचलत नव्हते. यावेळी त्यांनी सतत फोन केल्यानंतर सुनेने फोन उचलला. यानंतरही त्यांना घरात घेतले गेले नाही. मग हे प्रकरण सिंहगड रोड पोलिसांकडे गेले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी तात्काळ या घटनेचे गांभीर्य ओळखत मार्शलला बोलवून योग्य सूचना दिल्या. जेष्ठ महिलेला काळजी न करण्याचे सांगत त्यांना आधार दिला. त्यानंतर मार्शलला मुलाला आणि सुनेला फोन करण्यास सांगितले. मार्शलने त्यांना संपर्क केला. पण सुनेने “द्या त्यांना सोडून” आम्हाला काही माहिती नाही, असे म्हणत फोन कट केला. यामुळे पोलिसांनी या महिलेला रुग्णालयात दाखल केले. यानंतर आज पुन्हा या सुनेला आणि मुलाला पोलिसांनी बोलवून घेतले. ते पोलीस ठाण्यात आले. यावेळी त्यांना जाब विचारत आईला कोणी असे करते का याबाबत समजावून सांगितले. यावेळी सुनेने सर माझे वडील कालच मयत झाले. मी तिकडे होते. मी दुःखात होते. मला काहीच कळत नव्हते, असे सांगितले. यावेळी पोलिसांनी त्यांच्यात दुःखात सहभागी होत मार्गदर्शन करत आईला घरी घेऊन जाण्यास सांगितले. नंतर दोघांनी आईला घरी नेले आहे.