Pune : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय, शनिवार-रविवार मार्केटयार्ड बंद राहणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहे. पुण्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढणारी गर्दी कमी करण्यासाठी पुणे मार्केट यार्डात किरकोळ फळभाजी विक्रीला बंदी घालण्यात आली आहे. नागरिक किरकोळ भाजी आणि फळांच्या खरेदीसाठीही मार्केट यार्डमध्ये गर्दी करत असल्याने मार्केटयार्ड सुपर स्प्रेड सेंटर बनले आहे. यामुळे मार्केटयार्ड शनिवार-रविवार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून इतर दिवशी 50 टक्के क्षमतेने मार्केटयार्ड सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मार्केटयार्डात गर्दी होत असल्याने आणि कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका लक्षात घेऊन बाजार समितीने हा निर्णय घेतला आहे. मार्केटयार्डमध्ये नागरिकांची गर्दी होत असल्याने कोरोना संक्रमण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील किराणा, भाजीपाला, फळविभाग शनिवार-रविवार बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच इतर दिवशी 50 टक्के क्षमतेने मार्केटयार्ड सुरु ठेवण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे. बाजार समितीच्या निर्णयानुसार पुण्यातील मार्केटयार्डमध्ये फळे, भाजीपाला व्यापार दिवसाआड सुरु राहणार आहे.

पुण्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे पुणे पोलिस आणि प्रशासनाने मार्केटयार्ड परिसरात कडक निर्बंध लागू केले आहे. त्यानंतर बाजार समितीने मार्केटयार्ड शनिवार-रविवार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील गाळे दिवसाआड सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी बुधवार (दि.21) पासून होणार आहे, अशी माहिती बाजार समितीकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, पुण्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढणारी गर्दी कमी करण्यासाठी पुणे मार्केट यार्डात किरकोळ फळभाजी विक्रीला बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय आडते आणि खरेदीदारांना पास शिवाय मार्केटयार्डात यापुढे प्रवेश दिला जाणार नाही, असा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तसेच मार्केट यार्डमध्ये रिक्षा संपूर्ण दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून ओळखपत्राशिवाय बाजारात प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.