Pune : नियंत्रण सुटून भरधाव कार उरण फाटाजवळ खडकवासला बॅक वॉटरमध्ये कोसळली; आईसह 3 मुलींचा बुडून दुर्दैवी मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कारवरील नियंत्रण सुटून भरधाव कार उरण फाटाजवळ खडकवासला बॅक वॉटरमध्ये कोसळून झालेल्या घटनेत आईसह तीन मुलींचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर चालक असणारे वडील या दुर्घटनेत बचावले असून, त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अल्पना विठ्ठल भीकुले ( वय 45 रा. वीहीर, सध्या रा. चव्हाऩगर, धनकवडी), प्राजक्ता भीकुले (वय 21), प्रणिता भीकुले (वय 17) व वैदेही भीकुले (वय 8) अशी मृत्यू झालेल्याची नावे आहेत. तर वडील विठ्ठल केशव भिकुले (वय 46) हे बचावले आहेत. याप्रकरणी वेल्हा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भीकुले कुटुंबीय हे मूळचे वेल्हा तालुक्यातील विहीर गावचे आहेत. ते पुण्यात नोकरीनिमित्त राहतात. गेल्या अनेक वर्षांपासून ते पुण्यातील धनकवडीत राहतात. काही कामानिमित्त ते दोन ते तीन दिवसांपूर्वी गावी गेले होते. कुटुंबासह ते त्यांच्या संट्रो कारमधून गेले होते. दरम्यान आज दुपारी ते परत पुण्याकडे येत होते. यावेळी अचानक कार उरण फाटा येथे आल्यानंतर नागमोडी रस्त्यावर त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार बॅक वॉटरमध्ये कोसळली.

गावकऱ्यांना हा प्रकार दिसला. त्यांनी तात्काळ धाव घेतली. तसेच अग्निशमन दल व पोलीस यंत्रणेला या घटनेची माहिती दिली. यावेळी वेल्हा पोलीस ठाण्यातील कर्मचारी दीपक जाधव, इस्राक शेख, राजाराम घुले, सूर्यकांत ओंबासे, विजय कटके तसेच अग्निशमन दलाचे जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांच्या मदतीने पोलीस आणि अग्निशमन दलाने या कुटुंबाचा शोध सुरू केला. यावेळी प्रथम दोन मुलींचा शोध लागला. त्यानंतर दुसऱ्या मुलीचा शोध लागला व नंतर आईचा शोध लागला. तर वडील या घटनेत सुदैवाने बचावले असून, ते स्वतः बाहेर आले आहेत. ते जखमी मात्र झाले आहेत. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिक तपास वेल्हा पोलीस करत आहेत.