Pune : चिमुकलीच्या मृत्यूला जबाबदार ठरलेल्या ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बेजबाबदार ठेकेदाराने अष्टविनायक महामार्गासाठी खोदून ठेवलेल्या खड्ड्यात पडून एका चिमुकलीचा मृत्यू झाला होता. या कामात निष्काळजीपणा केल्या प्रकरणी बेल्हेकर इन्फ्राच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. तसेच ठेकेदाराविरोधात आक्रमक भूमिका घेण्यात आली होती.

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात कवठे येमाईच्या काळूबाई नगर परिसरात सुरू असलेल्या अष्टविनायक महामार्गाच्या कामासाठी बेल्हेकर इन्फ्राच्या ठेकेदाराने रस्त्याच्या कडेला सुमारे दोन महिन्यापूर्वी मोठा खड्डा खोदून ठेवला होता. या 8 फुट खोल असलेल्या खड्ड्यात पडून संतोष रामदास इचके यांच्या दोन वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाला आहे त्यामुळे संतप्त नागरिकांनी रस्ता बंद करत संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळेच ही घटना घडली असून त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच मुलीच्या आईने देखील बेजबाबदार ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानुसार संबधित ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेने काळूबाईनगर परिसरात ऐन दिवाळीच्या काळात शोककळा पसरली. एका चिमुकलीचा हकनाक बळी गेल्याने जमलेल्या नागरिकांचा संताप अनावर झाला होता. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी व त्या चिमुकलीच्या कुटुंबीयांची भेट घेत घटनेची सविस्तर माहिती घेतली. तर संबधित घटनेस जबाबदार असलेल्या दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन सपोनि काबुगडे यांनी नातेवाईक व उपस्थितांना दिले होते. त्यानंतर आता संबंधित ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.