पुणे : गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी विरुद्ध गुन्हा दाखल

पुणे  :  पोलीसनामा ऑनलाईन

पुण्यातील एका महिला पत्रकाराचा फेसबुक अकाऊंटवरील फोटो वापरून तो फोटो चुकीच्या पद्धतीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि श्री श्री रविशंकर यांच्या सोबत वापरून ट्विटरवर अपटलोड करुन अपमानास्पद लिखाण केल्याच्या आरोपावरुन गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांच्या विरुद्ध पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील भुगाव परिसरात राहणा-या एका ४५ वर्षीय महिला पत्रकाराने या प्रकरणी पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी जिग्नेश मेवानी यांच्या विरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिग्नेश मेवांनी यांनी या महिला पत्रकाराचे फोटो उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि श्री-श्री रविशंकर यांच्या फोटोबरोबर क्रॉप करून जोडले व ते “ओ माय गॉड” या चित्रपटातील एका फोटोशी जोडून त्यावर बदनामीकारक लिखाण केले. तसेच ते फोटो त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केले. शेअर करण्यात आलेले फोटो हे एका अनोळखी व्यक्तीच्या फेसबूक अकाऊंटवरून शेअर करण्यात आले आहेत.

या प्रकारामुळे त्यांच्या कुटुंबियांना मानसिक त्रास झाला असून त्यांनी पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील पौड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी मेवानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणात पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी स्वतः लक्ष घातले असून पुढील तपास पौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उध्दव खाडे अधिक तपास करीत आहेत.