Pune : सॅलिसबरी पार्क जवळ महिलेच्या गळयातील चेन हिसकावली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  शतपावली करणाऱ्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेल्याचा घटना घडली आहे. हा प्रकार सॅलिसबरी पार्क येथील महावीर स्कूलजवळ घडला आहे. याप्रकरणी 62 वर्षीय महिलेने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीवरील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांची एक मैत्रिण मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास जेवण झाल्यानंतर सॅलिसबरी पार्क परिसरातील लोढा हाऊस समोर शतपावली करत होत्या. त्यावेळी पाठीमागून भरधाव दुचाकीवरून दोघेजण त्यांच्याजवळ आले व त्यातील मागे बसलेल्या व्यक्तीने फिर्यादीच्या यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले. अधिक तपास स्वारगेट पोलीस करत आहेत.

कात्रजला घरफोडी…12 साड्या

शहरात घरफोड्या करणाऱ्या टोळ्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून, कात्रज येथील गुजरवाडी फाटा येथे घराच्या खिडकीची काच फोडून चोरट्यानी सुटकेसमध्ये ठेवलेले 30 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 12 साड्या चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी त्रिशुल सुभाष सुपनेकर (वय ३८, रा. गुजरवाडी फाटा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी सायंकाळी सात ते बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान घडला आहे.