Pune : ‘नंदलाल’च्या जागी ‘मंदलाल’ करुन विकलेल्या जमीन प्रकरणाला वेगळे वळण?

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –   ‘नंदलाल’ असे मालकाचे नाव असताना नावामध्ये मंदलाल असा बदल करुन बाणेर येथील 5 गुंठे जमीन विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही जमीन खरेदीखत करुन अब्दुल रहमान दुर्राणी यांना विक्री करण्यात आली होती. मात्र, ही जमीन लिटिगेशनमधील असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अब्दुल रहमान दुर्राणी यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात जबाब दिला असून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

बाणेर येथील 5 गुंठे जमीन अब्दुल रहमान दुर्राणी यांना बळीराम पवार आणि नाझीम शेख यांनी विकली होती. पवार आणि शेख यांनी दुर्राणी यांना सर्व कागदपत्र दाखवून जमीन राजेश मंदलाल जोशी असल्याचे सांगून दुर्राणी यांचा विश्वास संपादन केला. जमीनीचे टायटल क्लिअर असल्याने दुर्राणी यांनी जमीन खरेदी केली. तसेच या व्यवहाराची पेपरमध्ये जाहिरात दिली होती. यावर कोणीही हरकत घेतली नाही.

परंतु, हिंजवडी पोलिसांनी 9 एप्रिल रोजी दुर्राणी यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना हिंजवडी पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले. हिंजवडी पोलीस ठाण्यात आल्यानंतर दुर्राणी यांना ही जमीन लिटिगेशन मधील असल्याची माहिती मिळाली. दुर्राणी यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी हिंजवडी पोलिसांकडे गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. (दुर्रानी यांची याबाबतचे स्पष्टीकरण पोलीसनामा ऑनलाइनकडे लेखी स्वरूपात दिले आहे)

दरम्यान, हिंजवडी पोलिसांनी दिलीप बळीराम पवार (वय-49 रा. लोहगाव) याला अटक केली आहे. तर संतोष देशमाने, डी.एन. देशमाने, नवनाथ पत्की, अब्दुल रहमान रामचंद्र दुर्राणी,नजीम शेखलाल शेख आणि राजेश मंदलाल जोशी असे नाव धारण करणाऱ्या व्यक्ती व एक महिला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.