Pune : सावत्र बहिणीसोबत असलेल्या प्रेम प्रकरणावरून बाप-लेकांनी केला तरुणावर कोयत्याने हल्ला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सावत्र बहिणीसोबत असलेल्या प्रेम प्रकरणावरून एकाने वडिलांच्या मदतीने तरुणाच्या भावावर कोयत्याने वार केले. त्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वी रात्री अकराच्या सुमारास दांडेकर पूल परिसरात घडली आहे.

या प्रकरणी हर्षद गणेश जातेगावकर (वय २३), गणेश जातेगावकर (वय ५५, रा. शुक्रवार पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर हातागळे असे जखमी झालेल्याचे नाव आहे. आकाश मस्के (वय 23) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी रात्री अकराच्या सुमारास समीर आणि आकाश राहत्या घरासमोर शेकोटी करून बसले होते. समीरचा भाऊ अमनचे एका मुलीशी प्रेम होते. त्याचा राग मुलीचा सावत्र भाऊ हर्षदला होता. त्याचा वचपा काढण्यासाठी बाप-लेकांनी समीरवर कोयत्याने हल्ला केला. त्यामुळे समीर गंभीररित्या जखमी झाला आहे. अधिक तपास दत्तवाडी पोलीस करीत आहेत.