Pune : ‘खडक’च्या मनपा कॉलनीत पूर्वीच्या वादातून 6 जणांच्या टोळक्याने तरुणावर तलवारीने केले सपासप वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – खडकच्या मनपा कॉलनीत पूर्वीच्या वादविवादातून सहा जणांच्या टोळक्याने तरुणावर तलवारीने वार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी रोहित श्रीनिवास रागिर (वय 20) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार खडक पोलीस ठाण्यात फुग्या उर्फ योगेश गाटे, सुशील मिसाळ, आद्या, भैय्या, करण उर्फ ठोंबे आगलावे आणि सनी शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मित्र व आरोपी यांच्यात आठ दिवसांपूर्वी किरकोळ भांडण झाले होते. फिर्यादी तरुणाने मध्यस्थी करत हे भांडण मिटवले होते. याचा राग आरोपींच्या मनात होता. यादरम्यान काल (सोमवारी) योगेश गाटे हा त्याठिकाणी आला. त्याने “त्या दिवशी आमच्या भांडणांमध्ये कशाला पडला, आता तुझी विकेटच टाकतो” असे म्हणत वाद घातला. तसेच शर्टच्या पाठीमागे लपवलेली तलवार काढली. त्यानंतर शिवीगाळ करत फिर्यादी तरुणीवर वार केला. यामध्ये फिर्यादीच्या हाताचा अंगठा जवळ जखम झाली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी व त्याला वाचवण्यासाठीमध्ये आलेल्या मित्राला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर हे टोळके पसार झाले. माहिती मिळताच खडक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास खडक पोलीस करत आहेत.