Pune : ‘एक मदत तृतीयपंथीयांसाठी’ ! हेलपिंग हँड चे तृतीयपंथीयांना शिधा वाटप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात संचारबंदी आहे. त्यामुळे अनेक शोषित -वंचित -दुर्लक्षित- उपेक्षित घटकांतील समुदायांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यात तृतीयपंथी समुदायाचादेखील समावेश आहे. या समुदायाला ‘हेलपिंग हँड’ चे गिरीश गुरनानी आणि सनी मानकर यांच्याकडून धान्य किटचे वाटप करण्यात आले. पौड रोड परिसरातील काही भागातील २५ उपेक्षित तृतीयपंथीयांना गिरीश गुरनानी आणि सनी मानकर यांनी शिधा किट दिले.

तृतीयपंथी जेंव्हा भिक्षा मागतात तेंव्हाच त्यांना पैसे मिळतात, त्या पैशांतून ते आपली उपजीविका चालवतात. लॉकडाउनमध्ये पुन्हा संचारबंदी असल्यामुळे तृतीयपंथीयांचे हाल होत आहेत. या अभियानाद्वारे तृतीयपंथीयांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी हे शिधा वाटप केले, असे गिरीश गुरनानी म्हणाले यासंदर्भात तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्त्या सोनाली दळवी म्हणाल्या, आज आम्हाला उपजीविका भागविण्यासाठी कोणतेही साधन नाही. त्यामुळे उपासमारीची वेळ आलेली आहे. पंधराशे रुपयांची मदतीची घोषणा झाली असली तरी आमचे कोणाचे बँक खाते नाही, त्यामुळे आम्हाला हे पैसे एखाद्या स्वयंसेवी संस्थेमार्फत देता येतील का याबाबत विचार व्हावा.