Pune : बडया कंपनीतील उच्च पदस्थ महिला अधिकार्यास 4 कोटींचा गंडा, प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
पुणे : एका मोठ्या कंपनीत उच्च पदावर असलेल्या एका महिलेला सायबर चोरट्याने भुरळ पाडून चक्क ४ कोटी रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरु होता. शेवटी ६० वर्षाच्या या महिलेने सायबर पोलिसांकडे धाव घेऊन फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, ही महिला एका मोठ्या कंपनीत उच्च पदावर काम करीत आहेत. तिला गेल्या वर्षी फेसबुक अकाऊंटवर फ्रेंड रिकवेस्ट आली. त्यातून त्यांच्यात फेसबुकवरुन ओळख वाढली. या महिलेच्या वाढदिवसानिमित्त आरोपीने या महिलेला आयफोन कंपनीचा मोबाईल गिफ्ट म्हणून पाठविला असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी दिल्ली येथील कस्टम ऑफिसमध्ये मोबाईल पार्सल आले असून पार्सल सोडविण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून पैसे मागण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी किरकोळ रक्कम मागितली. ती त्यांनी दिली. त्यानंतर त्यांना धमकाविण्यास सुरुवात केली. तुमच्यावर कारवाई होईल, आयकर विभागाला सांगून तुमच्यावर छापा टाकायला सांगू असे प्रकारे धमकावून त्यांना वेगवेगळ्या २५ बँकेच्या ६७ बँक खात्यांवर तब्बल ३ कोटी ९८ लाख ७५ हजार ५०० रुपये पाठविण्यास भाग पाडले. तरीही त्यांच्याकडून धमकावले जात असल्याने शेवटी त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली. पोलीस निरीक्षक चिंतामणी अधिक तपास करीत आहेत़