Pune : भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लोणीकंद परिसरात ही घटना घडली आहे. जिजाबा सोनबा गोते (वय ७२, रा. मौजे बिवरी, ता. हवेली) असे मृत्यू झालेल्या जेष्ठ नागरिकाचे नाव आहे. सागर गोते (वय ३६) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार गोते मौजे बिवरी गाव परिसरातून निघाले होते. त्यावेळी भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यात जिजाबा हे खाली कोसळून गंभीर जखमी झाले होते. गोते यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण, त्यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. दरम्यान अपघात झाल्यानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला असून, त्याला शोधले जात आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सुहास पाटील करत आहेत.