Pune : उरुळी कांचनमध्ये दुचाकीचालकाच्या अंगावर झाड पडल्याने दोघेही गंभीर जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   उरुळी कांचन (खेडेकर मळा, ता. हवेली) येथील रस्त्यालगतचे झाड अर्धवट अवस्थेत जळाले होते. आज वाऱ्याच्या झोतामध्ये ते दुचाकीचालकाच्या अंगावर पडले. त्यामध्ये दुचाकीचालकासह सहप्रवासी दोघेही गंभीर जखमी झाले. ही घटना आज (मंगळवार, दि. 20) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.

अपघातग्रस्त दुचाकीवरील दोघेही (भरतगाव, ता. दौंड) येथील आहेत. त्यांना स्थानिक नागरिकांनी रुग्णवाहिका बोलावून उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये हलविले. याचवेळी त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी दोघांनाही ससून रुग्णालयात उपचारासाठी नेले.

दरम्यान, उरुळीकांचन, लोणी काळभोर, यवत येथील रुग्णालयात उपचारासाठी जागा मिळाली नाही. त्यामुळे त्यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. लोणी काळभोर पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांकडे चौकशी केली. मात्र, याबाबत त्यांच्याकडे कोणतीही तक्रार नसल्याचे पोलिसांनी सांगितले.