Pune : स्वारगेट येथील उड्डाणपुलाजवळ भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत महिलेचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – स्वारगेट येथील उड्डाणपुलाजवळ भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या महिलेचा मृत्यू झाला. तर तरुणी जखमी झाली आहे. भारती अनंत शिर्के (वय 55, पर्वती दर्शन, इंदिरा मिनी मार्केटजवळ) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मयूरी सुनील तिके (वय 26) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास फिर्यादी या त्यांची आत्या भारती शिर्के यांच्यासोबत स्वारगेट चौकातून सातारा रस्त्यावरील स्वारगेट एसटी स्टँडच्या समोरून जात होत्या. त्या बस स्थानकाच्या प्रवेश द्वारावर आल्यानंतर पाठीमागून आलेल्या भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात खाली पडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. यात त्यांचा मृत्यू झाला. स्वारगेट पोलिसांनी या प्रकरणी अनोळखी डंपर चालता विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास स्वारगेट पोलीस करत आहेत.