Pune : हडपसरमधील तरुणाने मेडिकेअर हॉस्पिटलला उपलब्ध करून दिला एक दिवसाचा ऑक्सिजन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मागिल वर्षभरापासून कोरोना महामारीने हाहाकार माजवला आहे. मागिल दोन महिन्यांपासून बेड, ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर, रेमडिसिव्हर इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांची तडफड होत आहे. याच भावनेतून वाढदिवस साजरा करण्याऐवजी हडपसरमधील अक्षय काळे या तरुणाने मेडिकेअर हॉस्पिटलला एक दिवस पुरेल एवढा ऑक्सिजन उपलब्ध करून दिला. तरुणांनी वाढदिवसाऐवजी समाजाच्या हितासाठी काम करण्याची गरज आहे, असे अक्षता केमिस्टचे अक्षय काळे याने सांगितले.

हडपसर (माळवाडी) मधील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये रविवारी (2 मे) छोटेखानी कार्यक्रमामध्ये ऑक्सिजन सिलेंडर दिले. याप्रसंगी मेडिकेअर हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. गणेश राख, राष्ट्रवादी काँग्रेसच्या हडपसर विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी अध्यक्ष डॉ. शंतनू जगदाळे, डॉ. लालासाहेब गायकवाड, डॉ. अशोक बनसोडे, डॉ. विराज सोनवणे, डॉ. विजय जोशी, सिद्धिविनायक ऑक्सिजन एजन्सीचे अभिजित ढोले आणि अक्षय काळे व कुटुंबीय उपस्थित होते.

काळे म्हणाले की, मागिल महिन्यापासून कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड वाढत आहे, त्यामुळे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जागा मिळत नाही. ऑक्सिजन मिळत नसल्याने रुग्णांचा जीव जात आहे, ही अवस्था पाहवत नाही. वाढदिवस पुन्हा कधी तरी साजरा केला जाईल. आता रुग्णांना मदत करणे ही आपली नैतिक जबाबदारी समजून एका हॉस्पिटलला छोटीशी मदत करण्याचा निर्णय घेतला, त्यासाठी कुटुंबीय आणि हॉस्पिटलचे सहकार्य लाभले, असे त्यांनी सांगितले.