Pune : कोंढव्यात भाई न म्हटल्याने झालेल्या भांडणाच्या रागातून तरुणावर कोयता, पालघनने प्राणघातक हल्ला; जखमांवर घालावे लागले 105 टाके

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  भाई न म्हटल्याने एक महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून ८ ते ९ जणांच्या टोळक्याने तरुणावर पालघन, कोयत्याने सपासप वार करुन जबर जखमी केले. प्रयत्नांची शर्थ करीत जखमांवर तब्बल १०५ टाके घालून डॉक्टरांनी या तरुणाचा प्राण वाचविला.

कोंढवा पोलिसांनी क्लॉईड, हर्षे, भूषण व त्याच्या ६ ते ७ साथीदारांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. फरहान अख्तर पिरजादे (वय १९, रा. गगन एमराल्ड सोसायटी, कोंढवा खुर्द) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना कोंढव्यातील सनश्री सोसायटीच्या समोरील रोडवर शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता घडली.

कोंढवा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी स्वप्नील पाटील व संतोष सोनवणे यांनी पोलिसनामा ऑनलाईन ला सांगितले की, क्लॉईड व त्याचे साथीदार यांचा एक महिन्यांपूर्वी फरहान याच्याबरोबर वाद झाला होता. क्लॉईड याने फरहान याला आपल्याला एकेरी भाषा वापरायची नाही भाई म्हणायचे असे धमकाविले होते यावरुन त्यांच्यात वाद झाला होता तेव्हा क्लॉईड याने फरहान याला लवकरच भेटू अशी धमकी दिली होती. फरहान याने दुर्लक्ष केले होते त्याची पोलिसांकडे तक्रार केली नव्हती.

फरहान व त्याचे मित्र शुक्रवारी सायंकाळी फुटबॉल खेळण्यासाठी जात होते. यावेळी क्लॉईड याने एक महिन्यापूर्वीच्या भांडणाच्या रागातून फरहानवर पालघनने चेहर्‍यावर वार केला. त्याचा साथीदार भूषण याने कोयत्याने फरहान याच्या डाक्यावर वार केला. तेव्हा त्याने हातमध्ये घातला तर त्याच्या हातावर दंडावर व मनगटावर, खांद्यावर सपासप वार करुन जबर जखमी केले.

यादरम्यान मध्ये पडलेले त्याचे मित्र ओवेस, फरदीन व जिशान शेख यांनाही धारदार शस्त्राने व बेसबॉलच्या स्टीकने मारहाण करुन जखमी केले. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, उपनिरीक्षक एस के सोनवणे, स्वप्नील पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अधिक तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.

लॉकडाऊन असताना कोंढव्यात लोकांचा सर्वत्र संचार असतो. मुले खेळायला मैदानात जातात. तर गुंड भर रस्त्यात जमून हैदोस घालत असल्याचे दिसून येत आहे.