Pune : कोंढव्यात तरूणावर कोयत्याने सपासप वार

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – कार चालकांनी किरकोळ वादातून दुचाकीस्वार तरुणावर कोयत्याने सपासप वार केल्याची घटना कोंढवा भागात घडली आहे. दुचाकी बाजुला न घेतल्यावरून ही हाणामारी घडली आहे.

नितीन निकाळजे (वय २२, रा. काकडे वस्ती, कोंढवा बुद्रुक) व अभिजित कांबळे असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी नितीन निकाळजे याने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन व मित्र अभिजीत दोघेही दुचाकीवरुन शुक्रवारी रात्री दहा वाजता कोंढव्यात जात होते. त्यावेळी नितीनच्या ओळखीतील कार तेथून जात होती. त्यावेळी आरोपींनी जोरजोरात हॉर्न वाजवून नितीनला दुचाकी बाजुला घेण्यास सांगितली. त्यावेळी त्यांना प्रसिसाद न दिल्यामुळे आरोपींनी नितीनच्या दुचाकीला कार आडवी लावली. त्यानंतर दोघांनी खाली उतरुन नितीनला शिवीगाळ केली. तसेच कोयता बाहेर काढून नितीनच्या डोक्‍यात वार केला. त्यानंतर आरोपींनी नितीनचा मित्र निकाळजे यालाही शिवीगाळ करीत जबर मारहाण केली. अधिक तपास उपनिरीक्षक चाऊस हे करीत आहेत