पुणे : बांधकाम साईट पहायला गेलेल्या तरुणांचे अपहरण करुन मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

सहकारनगर येथील बांधकाम साईट पहाण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांना पाच जणांच्या टोळक्याने अपहरण करुन बेदम मारहाण केली. याप्रकरणी दत्तवाडी पोलीसांनी सुधीर अशोक शिंदे (वय-३१, रा. लक्ष्मीनगर, पुणे) याला अटक केली असून त्याचे इतर साथिदार फरार आहेत. सुधीर शिंदे याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ही घटना सोमवारी (दि.२८) दुपारी दीडच्या सुमारास घडली.

तेजस राजु दबडे (वय-२१, रा. रामनगर, वारजे माळवाडी) याने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी सुधीर शिंदे, ऋषीकेश बारटक्के, प्रशांत वनशिव आणि त्याचे इतर ५ साथिदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाऊ सपकाळ यांच्या सांगण्यावरुन तेजस दबडे आणि त्याचा मित्र हर्षल व ऋषीकेश दवणे हे सहकारनगर येथील नाईन ग्रीन पार्क समोरील साईट पाहण्यासाठी आले होते. साईट पाहून परत जात असताना दुपारी दीडच्या सुमारास गजानन महाराज चौकात बारटक्के, शिंदे, वनशिव आणि त्यांच्या इतर साथिदारांनी तेजस दबडे आणि त्यांच्या मित्रांना आडवले. बारटक्के आणि त्याच्या इतर साथिदारांनी तेजसला तूम्ही इथे काय करता, कशाला साईटवर आला होता असे म्हणून गाडीवर बळजबरीने बसवून तीन हत्ती चौकात नेले. या ठिकाणी आरोपींनी साईटवर कशासाठी गेला होता याची चौकशी केली. त्यावेळी त्यांना साईट पहायला गेल्याचे सांगितले. परंतू आरोपींनी सांगितलेली माहिती खोटी निघाल्यास घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देत बेदम मारहाण केली.

दत्तवाडी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून सुधीर शिंदे याला अटक केली आहे. तर या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार ऋषीकेश बारटक्के, प्रशांद वनशिव हे फरार आहेत. पुढील तपास दत्तवाडी पोलीस करीत आहेत.