15000 रुपयाची लाच घेताना पुणे ग्रामिण पोलीस दलातील सहायक पोलीस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे/रांजणगाव : पोलीसनामा ऑनलाइन – प्रोहीबिशन अ‍ॅक्ट प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी आणि जामीनास मदत करण्यासाठी 15 हजार रुपयाची लाच घेताना पुणे ग्रामिण पोलीस दलातील रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षकाला रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. सुधाकर कोळेकर असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या सहायक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

तक्रारदार यांच्यावर रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात प्रोहीबिशन अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यामध्ये अटक न करण्यासाठी आणि जामीनासाठी मदत करण्यासाठी सुधाकर कोळेकर यांनी तक्रारदार यांच्याकडे 20 हजार रुपयाची मागणी केली. तडजोडीमध्ये 15 हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. आज पडताळणी केली असता सुधाकर कोळेकर यांनी तक्रारदार यांच्याकडे 20 हजार रुपयाच्या लाचेची मागणी करून 15 हजार रुपये स्विकारण्याचे कबुल केले. त्यानुसार आज रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात सापळा रचण्यात आला. सुधाकर कोळेकर याला तक्रारदाराकडून 15 हजार रुपयाची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. सहायक पोलीस उपनिरीक्षक सुधाकर कोळेकर यांच्यावर रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली. सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/