30 हजाराची लाच घेणारा पुण्यातील दौंड येथील उपकार्यकारी अभियंता, ठेकेदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बंद केलेल्या विद्युत पुरवठा मीटरची पुन्हा जोडणी करून मीटर सुरू करण्यासाठी तसेच जास्त बिल न आकारण्यासाठी 60 हजार रूपायाच्या लाचेची मागणी करून 30 हजार रूपयाच्या लाचेचा पहिला हप्ता घेणार्‍या दौंड (जि.पुणे) येथील उपकार्यकारी अभियंता आणि एका खासगी ठेकेदाराला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने अटक केली आहे.

मिलिंद नानासाहेब डोंबाळे (45, उपकार्यकारी अभियंता वर्ग-2, महावितरण कंपनी, ता. दौंड) आणि विक्रम सुदामराव पाटणकर (31, ता. दौंड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यासंदर्भात 36 वर्षीय तक्रारदाराने तक्रार दिली आहे. तक्रारदाराचा बंद असलेला विद्युत पुरवठा चालु करण्यासाठी आणि बिल जास्त न आकारण्यासाठी उपकार्यकारी अभियंता आणि खासगी ठेकेदाराने 60 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली होती.

लाचेचा पहिला हप्ता म्हणून 30 हजार रूपयाची लाच घेताना दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रकांत चौधरी, कर्मचारी चिमटे आणि राऊत यांच्या पथकाने ही कारवाई केली.

फेसबुक पेज लाईक करा