१,००,००० लाखाची लाच स्विकारणारा GSTचा विक्रीकर अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – व्यापार्‍याचे बंद केलेले बँक खाते (सील) परत चालु करून देण्यासाठी दीड लाख रूपयाच्या लाचेची मागणी करून एक लाख रूपयाची लाच स्विकारणार्‍या जीएसटीच्या विक्रीकर अधिकार्‍यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास रंगेहाथ पकडले.

रामकृष्ण यादवराव माने (रा. बीटी कवडे रोड, पुणे) असे लाच घेणार्‍याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, एका व्यापार्‍याने अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदार व्यापार्‍याच्या बँक खात्यास सील करण्यात आले होते. ते सील परत काढुन टाकण्यासाठी जीएसटीचे विक्रीकर अधिकारी रामकृष्ण माने यांनी तक्रारदाराकडे दीड लाख रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती एक लाख रूपयाची लाच देण्याचे ठरले. दरम्यान, तक्रारदार व्यापार्‍याची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार केली. प्राप्‍त तक्रारीची खातरजमा करण्यात आली.

अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सापळा रचला. त्यावेळी सरकारी पंचासमक्ष रामकृष्ण माने यांनी एक लाख रूपये स्विकारले. अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने त्यांना रंगेहाथ अटक केली. पोलीस अधिक्षक संदीप दिवाण, अप्पर अधीक्षक दिलीप बोरास्ते , उपाधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने ही कारवाई केली आहे. जीएसटी विक्रीकर अधिकार्‍यास एक लाख रूपयाची लाच घेताना अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.