20000 रुपयाची लाच घेताना पुणे महावितरण कंपनीचा वायरमन अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे/दौंड : पोलीसनामा ऑनलाइन – शेतात इलेक्ट्रीक ट्रान्सफार्मर बसवण्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून 20 हजार रुपयांची लाच मागून ती घेताना महावितरण कंपनीच्या दौंड कार्यालयातील वायरमनला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (गुरुवार ) करण्यात आली. सुभाष सगन शेळके (वय-37) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या वायरमनचे नाव आहे.

याप्रकरणी एका शेतकऱ्याने (वय-34) पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे बुधवारी (दि.5) तक्रार केली. तक्रारदार शेतकऱ्याची दौंड येथील येडेवाडी येथे शेत जमीन आहे. शेतामधील विहिरीवर विद्युत पंप आहेत. विद्युत पंपांची संख्या वाढल्याने नवीन इलेक्ट्रिक ट्रन्सफार्मर बसवण्यासाठी त्यांनी दौंडच्या महावितरण कंपनीच्या कार्यालयात अर्ज केला होता.

त्यांच्या अर्जानुसार नवी ट्रान्सफार्मर बसवण्यात आला. ट्रान्सफार्मर बसवण्याच्या मोबदल्यात वायरमन सुभष शेळके याने तक्रारदार शेतकऱ्याकडे बक्षिस म्हणून 20 हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार शेतकऱ्याने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पंचासमक्ष पडताळणी केली असता शेळके याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. आज दौड कार्यालयात सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून 20 हजार रुपयांची लाच स्विकारताना शेळके याला रंगेहाथ पकडण्यात आले. शेळके याच्यावर दौंड पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल बिले आणि पोलिस शिपाई थरकार यांच्या पथकाने केली.
सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.