वडगाव शेरीमधील तलाठी कार्यालयातील महिला कॉम्प्युटर ऑपरेटर आणि सेवानिवृत्त कोतवाल अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – जुने सात-बारा देण्यासाठी वडगाव शेरीमधील तलाठी कार्यालयातल्या महिला संगणक ऑपरेटरसह सेवानिवृत्त कोतवालाला एसीबीने 1 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. सोमवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. पुनम विष्णू जानवळे (वय 30, रा. वडगाव शेरी) आणि विकास शंकर जोशी (वय 60) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

पुनम ही वडगाव शेरी येथील तलाठी कार्यालयात संगणक अ‍ॅपरेटर आहेत. तर, विकास जोशी हे सेवानिवृत्त कोतवाल आहेत. सध्या ते तलाठी कार्यालयात मदतनीस म्हणून काम करत होते.

दरम्यान, यातील तक्रारदार यांना जुना सात-बारा घ्यायचा होता. त्यासाठी ते तलाठी कार्यालयात गेले होते. त्यावेळी विकास जोशी याने त्यांच्याकडे 1 हजार रुपयांची लाच मागितली. यानंतर तक्रारदार यांनी एसीबीकडे याबाबत तक्रार दिली होती. त्याची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, सोमवारी सायंकाळी पुनम जानवळे यांना तक्रारदार यांच्याकडून 1 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.

You might also like