अपघातात अपंगत्व आलेल्या पुण्यातील तरुणाला २ कोटीची नुकसान भरपाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन-पाच वर्षापूर्वी ट्रेलर आणि कारमध्ये झालेल्या अपघातात पिंपरी चिंचवडमधील एका तरुणाला कायमस्वरुपी अपंगत्व आले आहे. या तरुणाला ट्रेलरमालक आणि रिलायन्स जनरल इन्श्युरन्स कंपनीने २ कोटी १७ लाख १४ हजार रुपयाची नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मोटार अपघात न्यायाधिकरणाचे जिल्हा न्यायाधीश एस. के. कऱ्हाळे यांनी हा आदेश दिला. अपघातग्रस्ताला भरपाईपोटी इतकी मोठी रक्कम देण्याची ही राज्यातील पहिलीच वेळ आहे.

२०१३ पासून आठ टक्के व्याजदराने एकूण रक्कम तीन कोटी रुपये एक महिन्याच्या आत ट्रेलर मालक आणि रिलायन्स जनरल इन्श्युरन्स कंपनीने द्यावेत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. संबंधित तरुणाचा अपघात झाला ते‌व्हा तो बी. कॉमच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता. या अपघातामुळे त्याला कायमस्वरुपी अपंगत्व आले. त्याच्या उपचारावर ८० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. तो साडेतीन वर्षे जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता. त्याला आलेल्या अपंगात्वामुळे तो आता कधीच बरा होऊ शकणार नाही. २४ ऑगस्ट २०१३ रोजी हा अपघात झाला होता. यात प्रसाद प्रकाश दौंडकर (वय २०, रा. संत तुकारामनगर, पिंपरी) हा तरुण जखमी झाला.

प्रसाद त्याच्या मित्राबरोबर तळेगावहून कारने चाकणच्या दिशेनं येत होता. तेव्हा चालकाचं नियंत्रण सुटून समोरुन आलेल्या भरधाव ट्रेलरनं विरुद्ध दिशेला आला आणि कारला धडकला. यात कारचालक अंकुश सातपुते याचा जागीच मृत्यू झाला. तर प्रसाद गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने पवना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याला जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याच्यावर तिथे साडेतीन वर्षे उपचार सुरू होते. या अपघातामुळे प्रसादला कायमस्वरुपी अपंगत्व आले. त्याच्या मज्जारज्जूला मार लागला असून तो हालचाल करु शकत नाही.

पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यानंतर प्रसाद दौंडकर याला मुंबईला कोकीलाबेन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच्या उपचारावर ८० लाख रुपये खर्च आला. त्याच्या संपूर्ण आयुष्यावर झालेला परिणाम लक्षात घेऊन नुकसानभरपाई देण्यात यावी, असा युक्तीवाद अॅड. अतुल गुंजाळ यांनी कोर्टात केला होता.