पुणे-नगर महामार्गावर भीषण अपघात ; नवजात बालकासह एकाच कुटुंबातील चौघे जागीच ठार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे-नगर महामार्गावरील शिरूर येथे कंटेनर आणि वॅगनर कारचा भीषण अपघात झाला असुन त्यामध्ये २० दिवसांच्या नवजात बालकासह चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी रात्री घडली.

अपघात एवढा भीषण होता की त्यामध्ये वॅगनर कारचा चेंदामेंदा झाला. किशोर हाके, शुभम हाके आणि विमल हाके अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. वॅगनर कार ही अहमदनगरकडून पुण्याच्या दिशेने येत होती. वॅगनर कारची बंद पडलेल्या कंटेनरला पाठीमागुन जबरदस्त धडक बसली. त्यामध्ये कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

या अपघातामुळे हाके कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. अपघात एवढा भीषण होता की क्षणातच होत्याचे नव्हते झाले. कंटेनर कशामुळे थांबला होता याबाबत पोलिस माहिती घेत आहेत. दरम्यान, प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करीत आहेत.