Pune : युवा सेनेचे पदाधिकारी दिपक मारटकर यांचे खून प्रकरण – आरोपींनी कुख्यात गुंड बापू नायरची ‘ससून’मध्ये भेट घेण्यास परवानगी देणारे ‘हे’ 6 पोलीस निलंबित, जाणून घ्या नावे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील गाजलेल्या युवा सेनेचा पदाधिकारी दिपक मारटकर यांचा खून प्रकरणात कुविख्यात गुंड बापू नायर याच्या सांगण्यावरून खून केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आता याच प्रकरणात पुणे पोलीस दलातील 6 कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. बुधवारी निलंबनाचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र त्यांची नावे आणि निलंबनाची माहिती बाहेर पडू नये यासाठी खास ‘मेहनत’ घेतली जात होती.

याप्रकरणात कोर्ट कंपनीमधील पोलीस हवालदार सुभाष ननावरे, कर्मचारी सुधीर कुठवड, सूर्यकांत मानकुमरे, रोहित ओव्हळ, भीमाशंकर ठाणेदार, संजय चव्हाण यांना निलंबित करण्यात आले आहे.

सुभाष ननावरे हे पोलीस हवालदार असून, लोहमार्ग पोलीस दलातून ते पुण्यात बदलून आले आहेत. तर इतर पोलीस कर्मचारी 2016 बॅचचे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, युवा सेनेचा पदाधिकारी दीपक मारटकर यांचा 10 जणांनी कोयत्याने सपासप वारकरून निर्घृण खून केला होता. काही दिवसांत पुणे पोलिसांनी याप्रकरणी 10 जणांना अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर कुविख्यात गुंड बापू नायर याच्या सांगण्यावरून खून झाल्याचे समोर आले होते. या खुनातील आरोपी हे बापू नायर याला ससून रुग्णालयात भेटल्याचे समोर आले होते. बापू नायर सध्या कारागृहात आहे. उपचारासाठी तो ससून रुग्णालयात आला होता. त्यावेळी या आरोपींनी त्याची भेट घेतली होती. त्यानंतर हे खुनाचा प्रकार घडला.

दरम्यान बापू नायरला कोर्ट कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त होता. दोन ते तीन दिवस हा बंदोबस्त होता. पोलिसांचा बंदोबस्त असताना आरोपी नायरला कसे भेटले, असा प्रश्न या निमित्ताने समोर आला. अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली. त्यात हे सर्वजण त्या कालावधीत ड्युटीवर असल्याचे समोर आले. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कामात कुचराई करत त्यांनी पोलीस दलाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका ठेवत त्यांना निंलबीत केले आहे.

शेवटपर्यंत माहिती लपवली ?
नेमका ससून रुग्णालयात घडलेला प्रकार आणि त्यानंतर झालेली चौकशी व निलंबन प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी झाकण्याचा प्रयत्न केला आहे.