Pune : कुरकुंभ एमआयडीसीतील रसायनमिश्रित पाणी सोडणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करू : प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी नितीन शिंदे

पुणे : औद्योगिक विकास महामंडळाच्या कुरकुंभ येथील रासायनिक कंपन्यामधून रसायनमिश्रित पाणी थेट बाहेर सोडले जाते. त्यामुळे शेती नापिक बनत आहे, जलस्रोत दूषित झाले आहेत, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असल्याने ग्रामस्थांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलीस, महसूल, औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकाऱ्यांनी दखल घेऊन रासायनिक कंपन्यांनी उत्पादनानंतर कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या रसायनमिश्रीत सांडपाण्यावर प्रक्रिया न करता सोडणाऱ्या कारखान्याची माहिती घेऊन कारवाई करू असे आश्वासन प्रदूषण नियंत्रण मंडळ विभागीय अधिकारी नितीन शिंदे यांनी दिले.

कुरकुंभ येथील औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयात नुकतीच ग्रामस्थांसमवेत बैठक झाली. याप्रसंगी तहसीलदार संजय पाटील, पोलीस निरीक्षक नारायण पवार, औद्योगिक विकास महामंडळाचे उपअभियंता विजय पेटकर, सामुदायिक सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रप्रमुख नरसिंग थोरात, राहुल सरपंच राहुल भोसले, माजी उपसरपंच सुनील पवार, रोहित कुलांगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कुरकुंभ ग्रामस्थ म्हणाले की, रसायनमिश्रीत सांडपाणी सोडण्याचा प्रकार गेल्या वीस वर्षापासून सुरू आहे. याकडे शासन आणि लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष केले जात असल्याने हा प्रश्न आज तागायत सुटलेला नाही त्यामुळे कुरकुंभ ग्रामस्थ यांच्यामध्ये नाराजी निर्माण झालेली आहे. औद्योगिक वसाहत (कुरकुंभ) हा रासायनिक विभाग आहे. कारखान्याने उत्पादन केल्यानंतर बाहेर पडणाऱ्या रसायनमिश्रीत सांडपाण्यावर प्रक्रिया करून सामुदायिक समाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्र या ठिकाणी पाठवणे बंधनकारक आहे. यातील काही कारखाने रसायनमिश्रीत सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यावर होणारा खर्च टाळण्यासाठी प्रक्रिया न करता ते पाणी बाहेर सोडतात. बाहेर सोडलेल्या पाण्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी नापीक झाल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित झाले आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी अनेक वेळा शासनाकडे तक्रारी केल्या आंदोलने केली. आंदोलनाची दखल घेत अधिकाऱ्यांनी पाहणी करून कारवाईचे आश्वासन दिले होते. दरम्यान, जिल्हा अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्येदेखील बैठकी झाल्या. जिल्हाधिकारी यांनी चुकीचे काम करणाऱ्यांना कडक कारवाई करण्याचा इशारा दिला. मात्र, कारखानदारांवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. त्यामुळे काही ग्रामस्थांनी शेतातून ओढ्यात जाणारे पाणी अडवल्याने कुरकुंभ गावातून जाणाऱ्या महामार्गाच्या सेवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दुर्गंधीयुक्त पाणी साचल्याने स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, रसायनमिश्रीत पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवावा, अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले.