सर्दी, ताप असल्यास तातडीने उपचारासाठी पुढे या, 108 या क्रमांकावर ‘कॉल’ करा, होतील तातडीने उपचार : अति. मनपा आयुक्त रुबल अग्रवाल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सर्दी, तापाची लक्षणे दिसत असल्यानंतरही लोक तपासणीसाठी येत नाहीत. चार पाच दिवसांनंतर श्‍वास घेण्यात त्रास होउ लागल्यानंतर दवाखान्यात येतात. प्रामुख्याने मधुमेह, रक्तदाब आणि अन्य विकार असलेल्यांची प्रकृती अधिकच खालावते. दुर्देवाने अशाच व्यक्ती कोरोनामुळे बळी पडल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे. यामुळे सर्दी, तापाची लक्षणे दिसताच नागरिकांनी कोरोनाची तपासणी करण्यासाठी पुढे यावे, असे कळकळीचे आवाहन अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांनी केले आहे.

शहरात १० मार्चला पहिला कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे. यानंतर शहरातील रुग्णांची संख्या हळूहळू वाढत गेली. मागील दोन महिन्यांत अडीच हजारांहून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून १५० या आजाराला बळी पडले आहेत. महापालिकेने शहरात विविध संस्थांच्या मदतीने आरोग्य चाचण्या आणि सर्वेक्षण सुरू केल्याने रुग्ण आढळून येत आहेत. परंतू दुर्देवाने ताप, सर्दी अशी लक्षणे आढळल्यानंतरही काही नागरिक कोरोनाच्या तपासणीसाठी पुढे येत नाही. परस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर नागरिक उपचारांसाठी दाखल होतात. तोपर्यंत परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे आतापर्यंत या रोगाला बळी पडलेल्या घटनांमध्ये पाहायला मिळत आहे.

मृतांचे प्रमाण ५० पुढील वर्ष वयोगटातील अधिक आहे. आतापर्यंत मृत झालेल्या सर्वच वयोगटातील नागरिकांना पुर्वीचे आजार आहेत. अगोदरच प्रतिकारशक्ती कमी आणि त्यात कोरोनाची लागण झाल्यानंतर ती अधिकच क्षीण होउन रुग्णांकडून उपचारांना साथ मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. मृत्यू झालेल्यांपैकी बहुतांश रुग्ण हे अगदी दोन ते तीन दिवस अगोदर रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपल्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तिला ताप, सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे आढळल्यास तातडीने कोरोनाची तपासणी करून घ्यावी आणि रुग्णालयात दाखल व्हावे, असे कळकळीचे आवाहन पुन्हा एकदा करत असल्याचे अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले.

108 क्रमांकावर कधीही कॉल करा, पुढील काहीवेळात तुमच्यावर उपचाराची व्यवस्था करण्यात येईल

स्मार्ट सिटी आणि 108 क्रमांकाची ऍम्ब्युलन्स सेवेचे औंध येथील कार्यालयाने संयुक्त सॉफ्टवेअर विकसित केले आहे. पुणे महापालिकेची रुग्णालये, ससून रुग्णालय तसेच महापालिकेने करारबद्ध केलेली खाजगी रुग्णालये अशी सुमारे 8500 बेडस्ची सुविधा तत्पर ठेवली आहे. सध्या नेमके कोणत्या रुग्णालयात जायचे याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असून यामुळे उपचारांना विलंब होतो आणि रुग्णांना ताटकळावे लागते, ही वस्तुस्थिती आहे. यासाठी एक सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. यामध्ये कोणत्या रुग्णालयात किती बेडस् शिल्लक आहेत, याची माहिती स्मार्ट सिटीच्या डाटा सेंटरकडे उपलब्ध राहाणार आहे. 108 या ऍम्ब्युलन्स साठीच्या क्रमांकावर कॉल केल्यास तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करणे शक्य होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाची कुठलिही लक्षणे आढळल्यास फारसा वेळ न दवडता १०८ या क्रमांकावर फोन करावा, असे आवाहन रुबल अग्रवाल यांनी केले आहे.

पुण्यातील बरे होणार्‍या रुग्णांचा दर देशात सर्वाधिक ४५ टक्के रुग्ण बरे झालेत
शहरात तपासणीची संख्या वाढविल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. एमआयसीआरच्या पहिल्या गाईडलाईन्स प्रमाणे कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाला १४ दिवस हॉस्पीटल अथवा क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात येते. आतापर्यंत शहरात २७३७ रुग्ण आढळले असून १५६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल १२०९ रुग्ण बरे होउन घरी परतले आहेत. हे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या सुमारे ४५ टक्के इतके आहे. देशपातळीवर हेच प्रमाण ३१ टक्के इतके आहे. संपुर्ण देशाच्या तुलनेमध्ये पुण्यातील रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण हे सर्वाधीक आहे, असा दावा रुबल अग्रवाल यांनी यावेळी केला. नागरिकांनी तपासणीसाठी स्वत:हून पुढे आल्यास अधिक वेगाने कोरोना बाधितांचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल, असेही अग्रवाल यांनी नमूद केले.