दारुच्या नशेतील झटापट जीवावर बेतली; ढकलून दिल्याने वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  दारुच्या नशेतील झटापट तरुणाच्या जीवावर बेतली आहे. दोन मित्रांची झटापट सुरू झाल्यानंतर त्याला ढकलून दिले आणि त्याला वाहनाने उडविले. यात गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. सोमवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास खराडीतील झेन्सार चौकात ही घटना घडली.

गजानन भुजंग कदम (वय ३२, रा. खराडी ) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी हाउदलाल जब्बू साह (वय ४०, रा.खराडी) याला जेरबंद केले आहे. तर टेम्पो चालकाविरुदध गुन्हा दाखल केला आहे. किसन साळवे (वय ३९, रा. खराडी) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन आणि हाउदलाल एकमेकांचे मित्र असून खराडीत भंगार गोळा करुन विक्रीचा धंदा करीत होते. सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दोघेही दारु पिले होते. तसेच खराडीतील झेन्सार चौकात असलेल्या दुभाजकाच्या झाडाखाली गप्पा मारत बसले होते. दारुच्या नशेत त्यांच्यात बाचाबाची होउन झटापट झाली. त्याचा राग आल्यामुळे हाउदलालने गजाननला झाडाखालून रस्त्यावर ढकलून दिले. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या टेम्पोने गजाननला धडक दिली. त्यामुळे खाली पडल्याने गंभीररित्या जखमी झाला. यातच गजाननचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक किरण वराळ अधिक तपास करीत आहेत.