Pune : ‘त्या’ महिलेला हडपसर पोलिसांनी पकडल्यानंतर ते बाळ आज आईच्या खुशीत विसावले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – तीन दिवसांपूर्वी हडपसर परिसरातून 4 महिन्यांच्या बाळाचे अपहरण करणाऱ्या त्या महिलेला हडपसर पोलिसांनी पकडल्यानंतर ते बाळ आज सुखरूप आईच्या खुशीत विसावले. पुणे पोलिसांनी केलेल्या या कामगिरीने बाळाच्या नातेवाईकांनी पोलिसांचे आभार मानले. तिने बाळाचे कान टोचविण्याच्या बहाण्याने त्याच्या आईला नाश्ता करण्यात गुंतवून नेल्याचे समोर आले आहे.

अरुणा राजेंद्र पवार (वय ३६, रा. मांजरी बुद्रुक) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी २३ वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

फिर्यादी महिलेचे नवऱ्यासोबत भांडण झाले होते. त्यामुळे भांडणाचा राग मनात धरून महिलेने चार महिन्यांच्या बाळाला घेऊन घर सोडले होते. नगर जिल्ह्यातील लोणी गावातील असलेली ही महिला नगरला गेली. त्यानंतर तिने नगर ते सातारा बसने प्रवास केला. त्याचवेळी अरुणा त्यांच्या शेजारी सीटवर येऊन बसली व त्यांच्याशी ओळख वाढवून दोघीही स्वारगेट बस स्थानकात उतरल्या. स्वारगेट बस स्थानकात उतरल्यानंतर अरुणाने फिर्यादी महिलेच्या बाळाचे कौतुक करीत कान टोचविण्याचा बहाणा करीत तिला हडपसर परिसरात नेले. यानंतर ते डी. पी. रस्त्यावर एका चायनीज हॉटेलमध्ये जेवण केले. त्यानंतर अरुणाने बाळाला खाऊ आणण्याचा बहाण्याने बाळ स्वतःजवळ घेतले. त्यानंतर अरुणा परत आलीच नाही.

हडपसर पोलिसांनी तत्काळ घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शोध सुरू केला. ४५ सीसीटीव्ही आणि फोटोनुसार अरुणाचा शोध घेत तिला ताब्यात घेतले. चौकशीत तिने बाळाचे अपहरण केल्याची कबुली दिली. अरुणा मांजरी बुद्रुक परिसरात वास्तव्यास लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होती. ती मिळेल ती कामे करून उदरनिर्वाह करते. तिने बाळाचे अपहरण का केले होते, याचा तपास हडपसर पोलीस करीत आहेत.

पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक राजू अडागळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.