Pune : ‘भानगडी’ करणार्‍या ‘त्या’ पोलिस उपायुक्तास उपमुख्यमंत्र्यांनी ‘झापलं’ ! दादांनी कॉन्सिल हॉलमध्ये सर्वांसमोरच केला ‘पानउतारा’, सर्वत्र ‘खमंग’ चर्चा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ( नितीन पाटील ) – पुणे शहर पोलिस दलात गेल्या दीड वर्षापासून खुपच ‘स्मार्ट’ काम चालू होतं. त्याबाबतचा एक-एक ‘स्मार्ट’नेस आता समोर येत असून करण्यात आलेल्या अनेक भानगडीबाबत आता चर्चा रंगली आहे. त्याच झालं असं की, नुकत्याच राज्यातील पोलिस उपायुक्तांच्या बदल्या झाल्या. पुण्यातील काही उपायुक्तांना देखील बदलण्यात आलं. पुण्यातील कार्यकाळ पुर्ण न झालेल्या एका उपायुक्ताची देखील बदली करण्यात आली.

तीन दिवसांपुर्वी ‘त्या’ उपायुक्त महाराजांना थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कॉन्सिल हॉल येथे बोलावलं असल्याचा निरोप मिळाला. ते उपायुक्त तातडीनं कॉन्सिल हॉलमध्ये पोहचले खरे पण त्यानंतर जे घडलं त्याचा त्यांनी स्वप्नात देखील विचार केला नसेल. होय, तसंच काहीसं घडलं असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी पोलीसनामा ऑनलाइनला दिली आहे. अजितदादांनी ‘त्या’ उपायुक्ताचा सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांच्या समोरच पानउतारा केला. ही घटना 3-4 दिवसांपूर्वी घडली आणि तेव्हापासून पुणे पोलिस दलात त्याबाबतची खमंग चर्चा सुरू झाली.

तीन दिवसांपुर्वी सकाळी कार्यालयीन कामकाज सुरू झाल्यानंतर पोलिस आयुक्त कार्यालयातील एका उपायुक्ताला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलावल्याचा निरोप मिळाला. तत्कालीन आयुक्तांच्या कार्यकाळात ‘राजे’शाही थाटात वावरणारे ते उपायुक्त कॉन्सिल हॉलमध्ये काही वेळातच पोहचले. तेथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पुण्यातील इतर काही उपायुक्त, वरिष्ठ महसूल अधिकारी आणि पोलिस बंदोबस्तासाठी तैनात असलेले अधिकारी उपस्थित होते.

उपायुक्तांना पाहताच अजित पवार म्हणाले, तुमची बदमी मी स्वतः मुख्यमंत्र्यांना सांगून केली आहे. तुम्ही काय-काय उद्योग, भानगडी केल्यात, तुम्हाला काही वाटत नाही का ?, अजित पवार यांचा थोडा मोठा आवाज ऐकून आजूबाजूच्या उपस्थितांच्या नजरा आपोआपच अजित पवारांचे बोलणे ऐकून घेणार्‍या उपायुक्तांकडे गेल्या. त्यानंतर बराच वेळ अजित पवार यांनी ‘त्या’ उपायुक्त महाराजांना केलेल्या उद्योगाबाबत सांगितलं. ‘पन्नास’च्या वर भानगडी करणार्‍या ‘त्या’ उपायुक्तांची कारर्किद तत्कालीन आयुक्तांच्या काळात अगदी ‘राजे’शाही थाटात होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासुन एक-एक भागनड पुढं येऊ लागल्यानं त्यांची आता ‘डोकेदुखी’ वाढली आहे.

संबंधित उपायुक्तांनी कायद्यात बसत नसलेल्या देखील काही गोष्टी केल्या असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी पोलीसनामा ऑनलाइनला कळवली आहे. एवढंच नव्हे तर त्याची लांबलचक यादी देखील सांगितली. मात्र, शिळया कडीला ऊत आणण्यात अर्थ नाही. फसवणूकीचा गुन्हा दाखल होऊ शकत नसताना देखील ‘त्या’ उपायुक्तांनी कोणालाही न विचारता एका बिल्डरवर कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करून जणू ‘शिवतारा’च मिळवला.

प्रकरण होतं बिल्डरनं टाईल्स ज्या ठिकाणाहून घेतल्या त्याला दिलेला चेक बाऊन्स झाल्याचं पण दाखल झाला फसवणूकीचा गुन्हा आणि त्यामध्ये ‘त्या’ बिल्डरला अटक देखील करण्यात आली. तत्कालीन सरकारच्या काळातील तो गुन्हा असल्यानं फिर्यादीमध्ये चक्क सध्याच्या सत्ताधारी पक्षाच्या एका बडया नेत्याच्या पीएचं देखील नाव घेण्यात आलं. काहीएक संबंध नसताना ते नाव फिर्यादीमध्ये टाकण्यात आलं. ते नाव टाकण्यामागे नेमका काय हेतू होता हे फिर्याद वाचल्यानंतरच समजेल. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये आयुक्तालयात अनेक भानगडी करून बक्कळ ‘माया’ जमवल्याचं देखील बोललं जात आहे.

संबंधित उपायुक्तांनी चक्क राष्ट्रवादीच्या बडया मंत्र्यांचं नाव सांगून ‘पन्नास’चं काम दाखवलं असल्याची चर्चा कॉन्सिल हॉलमध्ये झालेल्या झापाझापीनंतर रंगली आहे. बडया मंत्र्यांच्या नावानं ‘पन्नास’चं काम दाखवण्याचं धाडस करणार्‍या ‘त्या’ उपायुक्तांनी आणखी कोण-कोणतं काम केलं याबाबतची अति वरिष्ठ म्हणजेच पोलीस आयुक्तांकडून चौकशी होण्याची गरज आहे. केवळ अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्याची चौकशी करून त्यामध्ये अनेकवेळा ’16/9′ केल्याचं काही पोलिस कर्मचारी सांगतात. त्याबाबत देखील चौकशी करणे गरजेचे आहे. तत्कालीन आयुक्तांच्या काळात कोंढवा पोलिस ठाण्यात एका बिल्डरविरूध्द अनेक अर्ज आले होते. ते आयुक्तालयात मागवण्यात आले पण त्याचं नंतर पुढं काय झालं हे देखील गौडबंगालच आहे.

गेल्या 3-4 दिवसांपासून पोलिस वर्तूळात फक्त आणि फक्त कॉन्सिल हॉलमध्ये नेमकं काय झालं याबाबतचीच चर्चा आहे. सध्या तरी ‘त्या’ संबंधित उपायुक्तांची पुण्यातून बदली झाली असली तरी त्यांना वेटिंगवर ठेवण्यात आलं आहे. त्यांची आज किंवा उद्या बदलीची ऑर्डर निश्चित होणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्या पध्दतीनं ‘त्या’ उपायुक्ताचा पानउतारा केला अगदी त्याच पध्दतीनं त्यांच्या कार्याकाळात आणखी नेमक्या काय-काय भानगडी झाल्या तसेच ‘त्या’ उपायुक्तांच्या शाखेत भानगडी करणारे एक रॅकेटचं होते काय याची चोकशी होण्याची गरज असल्याचं काही अधिकारी व कर्मचारी बोलत आहेत.